Lok Sabha Elections 2024 : शिंदे गटाच्या ४ जागांवर भाजप, राष्ट्रवादीची नजर | पुढारी

Lok Sabha Elections 2024 : शिंदे गटाच्या ४ जागांवर भाजप, राष्ट्रवादीची नजर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महायुतीचे लोकसभेच्या जागांचे 80 टक्के वाटप पूर्ण झाले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला, तरी शिवसेना (शिंदे) गटाच्या विद्यमान खासदारांच्या मावळ, रामटेक, वाशिम आणि हिंगोली या जागांवर भाजप आणि अजित पवार गटाची नजर आहे. शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत भाजप आणि अजित पवार यांनी या चार जागांवर दावा केला आहे. (Lok Sabha Elections 2024)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 13 खासदार आले आहेत. परंतु, आता शिंदे गटाला 13 जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत रामटेक, वाशिम आणि हिंगोली या तीन जागांवर भाजपने, तर मावळवर अजित पवार यांनी दावा केला आहे. (Lok Sabha Elections 2024)

रामटेक आणि वाशिम-यवतमाळ या विदर्भातील जागा भाजपला लढायच्या आहेत. तसेच रामटेक, वाशिम व हिंगोली या तिन्ही जागांवर हमखास भाजप उमेदवाराचा विजय होईल, असा भाजपचा अंदाज आहे. यासोबतच 30 पेक्षा जास्त जागा लढून 2019 मध्ये जिंकलेल्या 22 जागांपेक्षा जास्त जागा यावेळी भाजपला राज्यात जिंकायच्या आहेत; पण शिंदे गटाकडून भाजपच्या मागणीस विरोध होत आहे. मात्र, शिंदे यांच्या विरोधाला भाजपचे केंद्रीय नेतृत्व दाद देईल, अशी स्थिती नाही. मुंबईतील उत्तर पश्चिमच्या जागेवर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर उभे राहिले नाहीत, तर ही जागाही भाजप लढविण्याच्या मनःस्थितीत आहे. याबरोबर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या अन्य जागांवर भाजपची नजर आहे. यात सिंधुदुर्ग-रत्नागिरी, दक्षिण मुंबई, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी जागांचा समावेश आहे. (Lok Sabha Elections 2024)

मावळ राष्ट्रवादीला?

मावळ लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे लढले होते; पण त्यांचा पराभव झाला होता. आता ही जागा अजित पवार गटाला हवी आहे; पण शिंदे आणि अजित पवार यांच्यात संघर्ष सुरू आहे. केवळ चार जागा अजित पवार यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा त्यांच्या पारड्यात भाजपचे नेतृत्व टाकू शकते. (Lok Sabha Elections 2024)

Back to top button