Lok Sabha Elections 2024 : कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी | पुढारी

Lok Sabha Elections 2024 : कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर शाहू महाराज यांनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आहे. मात्र, कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढवायची, हे त्यांनी ठरवायचे आहे. त्यांनी जे ठरविले असेल ती जागा आघाडी म्हणून त्यांना देण्याचा निर्णय झाला आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

कोल्हापूरची जागा शाहू महाराज यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. ते काँग्रेसच्या तिकिटावर लढतील, असे शिवसेना ठाकरे गटाकडून सोमवारी सांगण्यात आले होते. तसेच त्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात येणार असल्याची आघाडीच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत पटोले यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली ठाकरे गटाला देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची महत्त्वाची बैठक

6 मार्चला होत आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीत जागावाटपाचे निर्णय होतील, असे पटोले यांनी सांगितले.

भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात देशातील मोठे भाजपचे नेते महाराष्ट्रात आहेत; पण त्यांची उमेदवारी जाहीर केली नाही. नितीन गडकरी यांच्याविरोधात मी निवडणूक लढवली होती. तेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने प्रचार केला; पण त्यांचे नाव या यादीत नाही, यातून भाजप कोणत्या दिशेने चालला आहे ते दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली. आता भाजप परिवार नाही तर केवळ मोदी परिवार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

हमी देण्याची काँग्रेसला गरज नाही

प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहिले आहे. त्यात भाजपसोबत जाणार नाही, अशी लेखी हमी द्या, असे त्यांनी सांगितले आहे; पण संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी तशी हमी देण्यास नकार दिला आहे, या प्रश्नावर पटोले म्हणाले, राज्याच्या राजकारणात अलीकडे ज्या घटना घडल्या, त्या पुन्हा घडू नयेत, अशी खबरदारी आंबेडकर घेत असतील; पण काही लोक भाजपला बाहेरून मदत करतात. मात्र, काँग्रेसकडून हमी देण्याची गरज नाही. आम्ही मोदी सरकारविरोधात लढत आहोत, असे पटोले म्हणाले.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांचे पक्ष भाजपने बरबाद केले; पण ते घाबरले नाहीत. ते मोठे नेते आहेत. त्यामुळे कोणाबद्दल अविश्वास निर्माण करू नये, असे आवाहन पटोले यांनी केले.

Back to top button