महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटणार? अमित शहा तोडगा काढणार

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटणार? अमित शहा तोडगा काढणार

मुंबई/नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटला नसून त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे समजते. दरम्यान, येत्या ८ मार्चला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असून, त्यात महाराष्ट्राच्या जागांवर चर्चा होणार असल्याचे समजते.

अमित शहा हे ५ मार्च रोजी अकोला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या बैठका आणि जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावतील. चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचाही ते आढावा घेतील. अकोल्यानंतर शहा हे जळगाव येथील पक्षाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची जाहीर सभा होईल. सभेनंतर ते रात्री मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर किंवा वर्षावर होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागावाटपाबाबत एकवाक्यता नसल्याने तिढा कायम आहे. शिवसेनेला १२, राष्ट्रवादीला ४ तर भाजपाला ३२ जागा मिळणार असल्याचे भाजपाकडून सांगितले जात आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला अधिकच्या जागा हव्या आहेत. जागा कमी मिळत असल्याने भाजपाच्या या मित्रपक्षांत नाराजी आहे. अमित शहा हे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील.

दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ८ मार्चला होणाऱ्या भाजपच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असेल. अद्याप महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटप झाले नसले, तरी या बैठकीआधी ते पूर्ण होईल, अशी चर्चा आहे. या बैठकीनंतर लवकरच भाजपची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार असल्याने सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.

८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निवडणूक समितीचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांबाबतही चर्चा होणार आहे.

याआधी २९ फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. त्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे २ मार्चला भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी यामध्ये घोषित करण्यात आली.

काँग्रेसची बैठक ७ मार्चला

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही उमेदवार ठरवण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ७ मार्चला बोलावली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ७ मार्चला सायंकाळी ६ वाजता ही बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, केंद्रीय निवडणूक समितीचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित असणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news