Harshvardhan Patil : महायुतीतील मित्रपक्षाकडून माझ्या जीवाला धोका : हर्षवर्धन पाटील | पुढारी

Harshvardhan Patil : महायुतीतील मित्रपक्षाकडून माझ्या जीवाला धोका : हर्षवर्धन पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्या जीवाला धोका आहे. आणि महायुतीतील मित्रपक्षाकडूनच जीवाला धोका आहे. मला मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी दिली जात आहे, असा सनसनाटी आरोप माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.४) पुढारी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. Harshvardhan Patil

पाटील म्हणाले की, महायुतीतील मित्रपक्षाचे तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी मतदारसंघातील जाहीर सभांमधून आम्हाला धमकी देत आहेत. याचे व्हिडिओ, क्लिप आमच्याकडे आहेत. मला मतदारसंघात फिरू देणार आहे. घराबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्याची चौकशी गृह विभाग करेल, असे ते म्हणाले. Harshvardhan Patil

इंदापूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे आमदार आहेत. मागील दोन टर्म भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभेला पराभव केला आहे. त्यामुळे पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत. अजित पवार यांनी आपल्याला फसविल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी जाहीर सभांमधून केला आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेला मदत केली तरच लोकसभेला पाठिंबा देणार असल्याचे सूचक विधान पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी केले आहे.

आता पाटील यांनी आपल्याला मित्रपक्षांकडून जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नाव न घेता केला आहे. त्यामुळे पुढील काळात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामधील दरी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

Back to top button