शेतकरी नव्हे, तर विरोधकच कोमात; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांसह ठाकरेंवर हल्लाबोल | पुढारी

शेतकरी नव्हे, तर विरोधकच कोमात; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांसह ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना शेतकरी कोमात नव्हे, विरोधकच कोमात असल्याची टीका केली. आपले सरकार गेले, या धक्क्यातून विरोधक अद्याप सावरले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी कधी आक्रमक शब्दांमध्ये, तर कधी हलक्या-फुलक्या शब्दांत चिमटे घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षांवर हल्ला चढविला.

विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विरोधकांच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडत सरकारवर चौफेर टीका केली. त्यानंतर बोलताना अन्य विरोधी आमदारांनीही सरकारला धारेवर धरले. या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अनेकदा त्यांनी टीका केली.

आमच्या सरकारमध्ये शेतकरी कोमात गेले आहेत, असे काही लोक म्हणत आहेत. हा शेतकर्‍यांचा, अन्नदात्याचा अपमान आहे. मी शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर गेलो. मी फेसबुक लाईव्ह करीत बसलो नाही. शेतकर्‍यांना आम्ही भरपूर मदत केली आहे. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांत राज्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात 5 हजार 520 कोटी रुपये जमा केले आहेत. शेतकर्‍यांशी संबंधित विविध योजनांवर आम्ही 30 हजार कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय आधीच्या सरकारने ज्या 121 सिंचन योजना बंद केल्या होत्या. त्या आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन सुरू केल्या आहेत. त्यामुळे खरे तर शेतकरी कोमात गेले नसून, विरोधक कोमात गेले आहेत, असा हल्ला त्यांनी चढविला.

पीक विमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकर्‍यांना 3 हजार कोटींहून अधिक रक्कम दिली. तुम्ही शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली, आम्ही त्यांचे अश्रू पुसत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.

मराठा आरक्षण टिकेल

मराठा आरक्षण टिकणार नाही, ही विरोधकांची टीका चुकीची आहे. आम्ही गेल्यावेळच्या निकालाचा अभ्यास केला. यावेळेस आम्ही सॅम्पल सर्व्हे केला नसून, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून विस्तृत व्यापक सर्वेक्षण केले आहे. मराठा समाज मागास असल्याचे आम्ही विविध कसोट्यांच्या आधारावर सिद्ध केले आहे, असेही शिंदे म्हणाले.

फडणवीस मराठा समाजाबाबत प्रामाणिक : मुख्यमंत्री शिंदे

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू देण्यात अडथळे आणत असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत कसे प्रामाणिक आहेत, हे स्पष्ट केले होते. मात्र, आज प्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या आरोपांचे खंडन विधानसभेतील आपल्या भाषणाद्वारे केले.

फडणवीस यांचा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रामाणिकपणा मी प्रत्यक्ष जवळून पाहिला आहे. त्यांनी केवळ मराठा समाजाला आरक्षणच दिले नाही, तर ते उच्च न्यायालयात टिकवूनही दाखविले. त्यानंतर सरकार बदलल्याने हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या खात्यातून काढलेल्या 50 कोटींची चौकशी

यावेळी एकनाथ शिंदे यांनी कुणाचेही नाव न घेता शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी रुपये काढण्यात आल्याचा आरोप केला. आमच्यावर काही लोकांनी खोके-खोके असा आरोप केला. मात्र, असा आरोप करणार्‍यांनीच आमच्या शिवसेनेच्या अधिकृत खात्यातून 50 कोटी रुपये काढले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सत्य लवकरच बाहेर येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button