मंत्री दादा भुसे-आमदार थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की

मंत्री दादा भुसे-आमदार थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विकासकामे आणि विकास निधीवरून विरोधी पक्षाच्या आमदारांना नाराजीचा सामना करावा लागत असतानाच, आता त्याचा प्रत्यय खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना येऊ लागला आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांना होत असलेल्या दिरंगाईवरून शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री व आमदारामध्ये जोरदार राडा झाला. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मंत्री दादा भुसे यांचा चक्क एकेरी उल्लेख करत आपल्या मतदारसंघातील कामे कधी होणार, अशी मोठ्या आवाजात विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये वादावादी होऊन धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, अशी धक्काबुक्की झाली नसल्याचे सांगत भुसे यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. विधिमंडळाच्या आवारात नेहमीसारखी वर्दळ सुरू होती. त्याचवेळी विधिमंडळाच्या लॉबीमधून मंत्री भुसे जात असताना आमदार थोरवे यांनी त्यांच्याशी विकासकामाबाबत विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये वाद वाढून धक्काबुक्की झाली. त्यावेळी लॉबीमध्ये एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली. यामुळे सत्ताधारी शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसून, अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा विधिमंडळात सुरू झाली. दरम्यान, मंत्री भुसे आणि आमदार थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा काय पुरावा आहे, जे घडलेच नाही ते तुम्ही कसे काय दाखवता, असा सवाल शंभूराज देसाई यांनी पत्रकारांना केला. भुसे व थोरवे यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चा सुरू असताना त्यांचा आवाज थोडा वाढला, त्यापलीकडे काहीही झालेले नाही. आमदार त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांची विकासकामांवरूनच चर्चा सुरू होती. थोरवे यांच्या मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात उद्या बैठक घेऊन मार्ग काढण्याचे ठरले आहे, असे देसाई यांनी सांगितले.

विधान परिषदेचे कामकाज एक तासासाठी तहकूब

सत्ताधारी पक्षाचेच मंत्री व आमदारामध्ये झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. मंत्री भुसे व आमदार थोरवे हे विधिमंडळाच्या लॉबीत एकमेकांना भिडले. या घटनेचे वृत्त सगळीकडे दाखवले जात आहे. एकाच पक्षाचे मंत्री व आमदार भांडत असतील, तर त्याचा खुलासा सरकारने केला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सभागृहातील विरोधी सदस्यांनी केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ही बाब तपासून घेतली जाईल. तरीही विरोधक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यावेळी गोर्‍हे यांनी संताप व्यक्त करत, तुम्हाला सरकारची बदनामी करायची आहे का, तुम्ही गोंधळ घालू नका, अशा शब्दांत सुनावले. मात्र, तरीही सभागृहात गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर उपसभापतींनी एक तासासाठी कामकाज तहकूब केले.

असे काहीच घडले नाही : दादा भुसे

मंत्री व आमदाराच्या वादाचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी या घटनेची माहिती घेऊन सभागृहात द्यावी, अशी मागणी केली. गँगवॉर सभागृहापर्यंत आले असेल, तर त्याची चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले. विधिमंडळाच्या पवित्र मंदिरात अशी घटना घडत असेल तर ते योग्य नाही. ही बाब थोरवेंनी प्रसारमाध्यमांनाही सांगितली आहे. हवे तर सभागृहाचे कामकाज थोड्यावेळासाठी बंद करून सभागृहाला माहिती द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तालिका अध्यक्षांकडे केली. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे काहीही घडलेले नाही. आपण भुसे आणि थोरवे या दोघांशीही बोललो असल्याचे सांगितले. दरम्यान, याचवेळी मंत्री भुसे सभागृहात आले आणि त्यांनी आमच्या दोघांमध्ये असे काहीच घडलेले नसल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले. तसेच सीसीटीव्हीचे फुटेजही पाहायला काहीच हरकत नाही. अध्यक्ष ते फुटेज दाखवू शकतात, असे भुसे म्हणाले.

दुरुस्तीच्या कामामुळे सीसीटीव्ही बंद : उपसभापती नीलम गोर्‍हे

दरम्यान, मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधान भवनाच्या द्वार मंडपाजवळ चर्चा सुरू असताना बोलण्याचा स्तर उंचावला असल्याचे चौकशीच्या माध्यमातून समोर आले असल्याची माहिती उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिली. दुरुस्तीच्या कामामुळे सीसीटीव्ही बंद असल्यामुळे चित्रीकरण उपलब्ध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधिमंडळातील बातम्यांचे वार्तांकन अतिरंजित न करता वस्तुनिष्ठ करावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news