वंचित बहुजन आघाडीची ‘मविआ’कडे २६ जागांची मागणी | पुढारी

वंचित बहुजन आघाडीची ‘मविआ’कडे २६ जागांची मागणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा घोळ कायम असताना वंचित बहुजन आघाडीने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव बुधवारी (दि.२८फेब्रुवारी) दिला. तसेच वंचितने राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी २६ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. या प्रस्तावामुळे जागावाटपाचा घोळ आणखी वाढला आहे. त्यामुळे दोन दिवस काथ्याकूट करूनही महाविकास आघाडी जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात अपयशी ठरली. मविआची बैठक बुधवारी पार पडली.

जागावाटपाचा वाद दिल्लीत जाणार

या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे गटाने आम्ही वीसपेक्षा कमी जागा घेणार नाही, असे या बैठकीत सांगितले आहे. ठाकरे गटाने मागणी केलेल्या हिंगोली, रामटेक, छत्रपती संभाजीनगर आदी जागांवरील आपला दावा काँग्रेसने सोडलेला नाही. त्यामुळे जागावाटपाचा हा वाद आता दिल्लीत जाणार आहे.

जरांगेंना जालना मतदार संघातून उमेदवारी देण्‍याची मागणी

या बैठकीत वंचितच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी जागावाटपाच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात जरांगे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुणे लोकसभा मतदारसंघात आघाडीचे सर्वसंमतीने उमेदवार म्हणून डॉ. अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांपैकी किमान 15 इतर मागासवर्ग समाजातील, तर किमान तीन अल्पसंख्याक समाजातील असावेत, अशी सूचनाही वंचितने केली आहे. वंचितच्या या सूचनेमुळे महाविकास आघाडीसमोर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वंचितने दिलेली लोकसभा मतदारसंघांची यादी

अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलडाणा आणि वर्धा.

खासदार शिंदे यांच्याविरोधात ‘मविआ’कडून महिला उमेदवार?

कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीत सक्षम उमेदवाराचा शोध सुरूच आहे. काही इच्छुकांनी माघार घेतल्याने राज्यस्तरीय आक्रमक महिला नेत्याला कल्याण लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात प्रचाराची रणनीती आखली जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसर्‍यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांची विजयी हॅट्ट्रिक रोखण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने महाविकास आघाडी कमजोर झाली.

Back to top button