रेड बस अ‍ॅपला एसटी महामंडळाचा दणका; करार रद्द | पुढारी

रेड बस अ‍ॅपला एसटी महामंडळाचा दणका; करार रद्द

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांना मोबाईलवरुन सहज तिकिट काढता यावे यासाठी एसटी महामंडळाने ‘मल्टी ऑनलाइन रिझव्हेंशन सिस्टिम’ (एमटीओआरएस) संकल्पनेंतर्गत ‘रेडबस अ‍ॅप’शी करार केला होता. परंतु, रेडबसवरुन तिकिट काढताना विम्याच्या नावाखाली प्रवाशांकडून जादा रक्कम घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महामंडळाने रेडबस अ‍ॅपशी केलेला करार रद्द केला आहे.

संबंधित बातम्या 

एसटीने वर्ष 2015 मध्ये तिकिट आरक्षणाकरिता ‘इंद्रधनू आरक्षण प्रणाली’ची सुरुवात केली. या प्रणालीमध्ये रेडबसला बाह्यसंस्था म्हणून नेमण्यात आले. करारानुसार रेडबसला मासिक तिकिट विक्रीवर 6 लाख रुपयांपर्यंत 4 टक्के, 6 ते 10 लाखांपर्यंत 5 टक्के आणि 10 लाखांच्या पुढे 6 टक्के कमिशन देण्याचे ठरले होते. त्यावेळी एसटीची दिवसाची प्रवासी संख्या 15 लाख 39 हजार तर रेडबसची प्रवासी संख्या 12 हजार होती.

नव्या आरक्षण प्रणालीमुळे 2019 मध्ये रेडबसच्या अ‍ॅपवरून तिकीट खरेदी वा आरक्षण करणार्या प्रवाशांची संख्या 14 लाख 46 हजारांवर पोहोचली. तर एसटीच्या अ‍ॅपवरील प्रवासी संख्या 14 लाख 37 हजार एवढी झाली. म्हणजे एसटी अ‍ॅपवरील प्रवासी घटले.

रेड बस अ‍ॅपवरुन तिकिट काढताना प्रवाशांकडून कमिशनच्या रक्कमेसह विम्याच्या नावाखाली अधिकची रक्कम घेण्यात येत होती. त्याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत होता. एका प्रवाशांने कुर्ला ते जालना प्रवासासाठी रेडबसवरुन तिकिट बुक केले असता त्याच्याकडून 18 रुपये जास्त घेण्यात आले.

यासंदर्भात त्या प्रवाशाने तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जाग आलेल्या महामंडळाने रेडबसला नोटीस पाठवून त्यांचे पैसे रोखण्यात आले.

प्रवाशांची लूट

2015 ते 2019 पर्यंत 14 लाख 49 हजार प्रवाशांनी रेडबसवरुन तिकिट बुक केले होते. प्रत्येक प्रवाशांकडून 18 रुपये यानुसार रेडबसने 4 कोटी 1 लाख 91 हजार रुपये वसूल केल्याचे लेखापरिक्षणातून निदर्शनास आले आहे. त्यानुसार महामंडळाने रेडबसला कारणे दाखवा नोटीस बजावली.

Back to top button