ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढणार? | पुढारी

ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढणार?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या घटक पक्षांचा निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसताना ठाकरे गटाने मोर्चेबांधणी करत पक्षाची ताकद असलेल्या 18 लोकसभा मतदारसंघांत निवडणूक समन्वयक नेमले आहेत. यामध्ये मुंबईतील चार जागांसह ठाणे, नाशिक, रायगड व कोल्हापूरचाही समावेश आहे. सुनील वामन पाटील यांच्यावर कोल्हापूरची जबाबदारी दिली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीनेही दावा केलेल्या मतदारसंघातही ठाकरे गटाने समन्वयक नेमल्याने आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर समन्वयक नेमलेल्या ठिकाणीच ठाकरे गट लोकसभेची निवडणूक लढवणार का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक एकजुटीने लढणार्‍या महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अनेक बैठका झाल्या. मात्र एकाच मतदारसंघावर दोन पक्षांनी केलेला दावा, मतदारसंघ फेरबदल करण्याची मागणी आदी गोष्टींमुळे जागावाटपांचा तिढा सुटलेला नाही. इंडिया आघाडीतून एकेक पक्ष फुटत असताना महाराष्ट्रात मात्र ठाकरे गट लोकसभेच्या 48 जागांपैकी 23 जागा लढण्यावर ठाम आहे. त्यातच आघाडीत नव्याने सहभागी झालेल्या वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हेही स्पष्ट झालेले नाही. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात आघाडीचे 42 जागांचे वाटप पूर्ण झाले असून अजून 6 जागांवर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करत मैदानात उतरलेले शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनेचे बालेकिल्ले असलेले मतदारसंघ आपल्याकडेच राहावेत, यासाठी जोरदार ताकद लावायला सुरुवात केली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीनेही दावा केलेल्या मतदारसंघातही ठाकरे गटाने निवडणूक समन्वयक नेमल्याने उर्वरित जागा ठाकरेंनी मित्रपक्षाला सोडल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला असून यावरून आघाडीत गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

मुंबईतील दोन जागा काँग्रेसला?

ठाकरेंकडून नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक समन्वयकांमध्ये मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघांत निवडणूक समन्वयक नेमले आहेत. यामध्ये मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य), मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र, यामध्ये उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघाचा समावेश नसल्याने हे दोन मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Back to top button