भाजपकडून कोणतीही ऑफर नाही; मी कुठेही जाणार नाही : जयंत पाटील | पुढारी

भाजपकडून कोणतीही ऑफर नाही; मी कुठेही जाणार नाही : जयंत पाटील

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मला भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. इतकेच नव्हे; तर मी कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी केलेे.

पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधील पश्चिम महाराष्ट्रातील एक नेता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेच्या बातम्यांना अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिल्लीत न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही आपण महाराष्ट्रातच आहोत. त्यामुळे दिल्लीतही कोणाशी भेट घेण्याचा प्रश्न नाही.

हातकणंगलेसाठी प्रतीक पाटील यांच्याबाबत चाचपणी

माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सांगली किंवा हातकणंगले या मतदारसंघांमधून लोकसभेसाठी उमेदवारी देता येईल का, याची पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. दरम्यान, हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. कारण त्यांची आमच्या पक्षासोबत चर्चा झालेली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी त्यांची काही प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

भाजपमध्ये प्रवेशासाठी कुणालाही नकार नाही : बावनकुळे यांचे मत

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या गॅरंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही. आमचा दुपट्टा तयारच असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

जयंत पाटील यांच्याविषयीच्या चर्चेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. ते कोणाच्या संपर्कात आहे हे मला माहिती नाही. परंतु ते माझ्या संपर्कात नाहीत.

Back to top button