राज्यसभा निवडणूक बिनविरोध | पुढारी

राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी सहा जागांसाठी सहाच प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे राज्यसभा निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यसभेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी होणार आहे. या छाननीनंतर राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा होईल.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे सहा सदस्य राज्यसभेवर निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारी शेवटच्या दिवशी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी गुरुवारी आपले अर्ज दाखल केले. पुण्यातील विश्वास जगताप या एका हौशी उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आमदारांच्या सह्या नसल्याने हा अर्ज बाद ठरणार आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे काँग्रेसमधील अशोक चव्हाण समर्थक आमदार राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान करू शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. भाजप शेवटच्या क्षणी चौथा उमेदवार देऊन काँग्रेसची चिंता वाढवेल की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, भाजपने अधिकृत तीन उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभा निवडणूक टळली आहे. त्यामुळे सर्व सहाही उमेदवारांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून राज्यसभेचा अर्ज भरल्याने पक्षफुटीच्या भीतीने धास्तावलेल्या काँग्रेस नेत्यांचा जीवही यामुळे भांड्यात पडला आहे.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असल्याने आपल्या राजकीय वाटचालीत सातत्याने लोकसभा आणि विधानसभेत नांदेडचे प्रतिनिधित्व करणारे अशोक चव्हाण हे प्रथमच संसदेत ज्येष्ठांच्या सभागृहात बसणार आहेत. याशिवाय मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पहिल्यांदा राज्यसभेत पाय ठेवणार आहेत. सध्या राज्यसभेचे सदस्य असलेले प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

चंद्रकांत हंडोरे यांचा अर्ज भरताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीचे सर्व उमेदवार जिंकून येतील. कारण आमच्याकडे बहुमत आहे आणि बहुमताचा आकडा महत्त्वाचा असतो. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली असून ते एक उच्च विद्याविभूषित उमेदवार आहेत. त्याचा फायदा महायुतीला नक्कीच होईल. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचे अतिशय स्नेहाचे संबंध होते. आता मिलिंद देवरा हे शिवसेनेकडून राज्यसभेत जाणार असल्यामुळे नक्कीच त्याचा सर्व क्षेत्राला फायदा होईल.

Back to top button