अशोक चव्हाण यांनी पाठीत खंजीर खुपसला : रमेश चेन्नीथला

अशोक चव्हाण यांनी पाठीत खंजीर खुपसला : रमेश चेन्नीथला
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अशोक चव्हाण डरपोक आहेत. ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करत त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते. पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. काँग्रेस पक्षाने चव्हाण यांच्यावर काय अन्याय केला? की ईडी, सीबीआयला घाबरून ते गेले, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, असे चेन्नीथला म्हणाले.

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याने काँग्रस पक्ष कमजोर होणार नाही. पक्ष विचारधारेनुसार काम करत असतो. त्यामुळे पक्ष सोडणार्‍यांना जनता स्वीकारत नाही. काँग्रेस पक्ष आणखी जोमाने काम करेल आणि लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करेल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांच्यासारखा जनाधार असलेला नेता काँग्रेसपासून दुरावल्याने पक्षाची संभाव्य राजकीय हानी टाळण्यासाठी रमेश चेन्नीथला सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज निवडक ज्येष्ठ नेत्यांची बैठकही घेतली. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चव्हाण यांच्यावर टीका केली.

चव्हाण यांनी पक्ष सोडताना कोणतेही कारण दिले नाही. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले ते नंतर भाजपमध्ये गेले. भाजप वॉशिंग मशिन आहे का, असा सवाल करत चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचे कारण सांगावे. ही त्यांची जबाबदारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले.
ते काँग्रेस सोडून गेले असले तरी इतर कोणीही जाणार नाही. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांसह जोमाने लढा देत राहील. अशोक चव्हाण दिल्लीत खर्गे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना भेटले आणि परवा बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. तरीही त्यांनी पक्ष सोडला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकू

भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदर्श घोटाळ्याचा आरोप केला आणि आज ते भाजपत गेले. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळाच्या आरोप मोदींनीच केला होता. त्यांनाही सत्तेत सहभागी करून घतले. मोदी-शहांना भेटले की भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात का, असा सवाल करत महाराष्ट्र विकास आघाडी मजबूत असून त्याला कमजोर करण्यासाठी भाजप धडपड करत आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशीही आम्ही चर्चा केली आहे. आघाडी मजबूत आहे आणि महाराष्ट्रातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकू, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

चव्हाणांनी निर्णयाचा फेरविचार करावा : पटोले

अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आता मागील रांगेत बसावे लागेल. भाजप अनेक प्रयत्न करूनही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकत नाही हे त्यांच्याच सर्वेक्षणात दिसत असल्याने फडणवीस यांची अडचण झाली आहे. त्यामुळे ते त्यांची आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. 15 तारखेला काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आहे. त्यानंतर 16 आणि 17 तारखेला लोणावळ्यात शिबिर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

दबाव किंवा स्वार्थामुळे पक्षांतर : थोरात

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांवर लाठीहल्ला सुरू होता. चव्हाण हे विचाराचे पक्के आहेत. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही काँग्रेसने मुख्यमंत्री, केंद्रात विविध खात्याचे मंत्री अशी संधी दिली. असे असताना ते भाजपमध्ये गेले याचा अर्थ त्यांच्यावर दबाव असावा किंवा स्वार्थासाठी ते भाजपमध्ये गेले असावेत. परंतु जनता जागृत आहे. भाजपला धडा शिकवेल. महाविकास आघाडी मजबूत असून विधानसभेला विजय मिळून आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news