Ashok Chavan | मी आज भाजपमध्ये प्रवेश करतोय; अशोक चव्‍हाणांची घोषणा

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "आज माझ्या राजकीय कारकिर्दीची एक नवीन सुरुवात आहे. मी आज त्यांच्या कार्यालयात औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहे," अशी घोषणा काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांनी 'एएनआय'शी बोलताना केली. आज मी १२-१२.३० च्या सुमारास माझ्या राजकीय कारकिर्दीचा एक नवीन प्रवास सुरू करणार आहे, मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी आज मंगळवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुंबई भाजप कार्यालयात दुपारी १२-१२३० च्या सुमारास त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अमर राजूरकर यांचादेखील भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण राज्यसभेसाठी उद्या अर्ज भरणार असल्याचे समजते.

काल सोमवारी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, 'भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही' असे म्हटले होते. तसेच माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे १५ ते १८ आमदार जातील, असे चव्हाण यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. यात नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या चार आमदारांचा समावेश असेल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी आणि मिलिंद देवरा यांनी याआधी काँग्रेसची साथ सोडली होती. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे.

अशोक चव्हाणांमुळे बिघडणार राज्यसभेचे गणित?

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार त्यांच्यासोबत जाऊ शकतात. या आमदारांनी राज्यसभा निवडणुकीपुर्वी राजीनामा दिला किंवा वेगळी भूमिका घेतल्यास काँग्रेसची महाराष्ट्रातील राज्यसभेतील एक जागा निश्चित मानली जात असताना अशोक चव्हाण यांच्या भूमिकेमुळे तीही धोक्यात येऊ शकते.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news