Ashok Chavan Resign | काँग्रेसचा अजून एक गड ढासळला, अशोक चव्हाणांनी सोडला ‘हात’ | पुढारी

Ashok Chavan Resign | काँग्रेसचा अजून एक गड ढासळला, अशोक चव्हाणांनी सोडला 'हात'

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे. (Ashok Chavan Resign)

अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदारकी सोडली म्हणजे पक्षही सोडला. भाजपमध्ये प्रवेशाची दाट शक्यता आहे. आमदारकी अचानक सोडण्यामागे राज्यसभेची निवडणूक आहे. अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचे समजते. पण त्यांची जागा चार खात्रीच्या जागांमधली आहे की महायुती लढवणारी पाचवी जागा आहे ते अजून निश्चित नाही.

खरं तर महाविकास आघाडी सरकार पडले तेव्हाच अशोक चव्हाण भाजपात जातील अशा वावड्या होत्या. कारण शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी अशोक चव्हाणांसह 11 आमदार गैरहजर होते. त्यामध्ये

1 विजय वडेट्टीवार
2 धीरज देशमुख
3 प्रणिती शिंदे
4 जितेश अंतापूरकर
5 झिशान सिद्दीकी
6 राजू आवळे
7 मोहन हंबर्डे
8 कुणाल पाटील
9 माधवराव जवळगावकर
10 शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.

आता दीड-दोन वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. समीकरणं,परिस्थिती बदललीय. प्रणिती शिंदेंनी भाजपात जाणार नसल्याचं गेल्याच महिन्यात स्पष्ट केलंय. झिशान सिद्दीकी हे वडील बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत गेल्यानं चव्हाणांसोबत जातील असं वाटत नाही. विजय वडेट्टीवारही भाजपच्या वाटेवर असल्याची अनेकदा चर्चा होती. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी ते साधे आमदार होते. आता विरोधी पक्षनेते आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी वर्ष-दीड वर्षांपूर्वी विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत विरोधकांचे आमदार फोडून चमत्कार घडवले होते. आता पुन्हा तेच होण्याची शक्यता आहे. (Ashok Chavan Resign)

हेही वाचा :

Back to top button