Baba Siddiqui : कॉंग्रेसला सोडचिट्टी दिलेल्या बाबा सिद्दिकी यांचं अखेर ठरलं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश | पुढारी

Baba Siddiqui : कॉंग्रेसला सोडचिट्टी दिलेल्या बाबा सिद्दिकी यांचं अखेर ठरलं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला सोडचिट्टी दिलेल्या माजी मंत्री, कॉंग्रेस नेते बाबा सिद्दिकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “बाबा सिद्दिकी १० फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि ११ फेब्रुवारीला आणखी काहीजण पक्ष प्रवेश करतील.” (Baba Siddiqui) बाबा  सिद्दीकी यांनी गुरुवारी (दि.८) कॉंग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Baba Siddiqui : कोण आहेत बाबा सिद्दीकी?

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. मूळचे बिहारमधील असलेल्या व मुंबईमध्ये राजकीय कारकिर्द सुरु झालेल्या बाबा सिद्दीकी यांना लोक बाबा झियाउद्दीन सिद्दीकी या नावानेही ओळखतात. मात्र, ते बाबा सिद्दीकी या नावानेच अधिक लोकप्रिय आहेत. मुंबई काँग्रेसमधील ते महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तीमत्व मानले जात होते. १९७७ मध्ये किशोरवयीन जीवनात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नंतर ते भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघचा  (NSUI) भाग बनून वेगवेगळ्या चळवळींमध्ये सहभागी होत राहिले. बाबा सिद्दीकी यांनी मुंबईच्या एमएमके कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबा दोनवेळा नगरसेवकही राहिले आहेत. यानंतर बाबा सिद्दीकी तीन वेळा वांद्रा येथून काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेत आमदार झाले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबा सिद्दीकी यांचा पराभव झाला होता.

48 वर्षांचा महत्त्वाचा प्रवास…

माजी मंत्री, कॉंग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (दि.८) कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या ‘X’ अंकाउंटवर पोस्ट करत म्हटले होते की, “मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो. हा 48 वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला या प्रवासाबद्दल बोलायला खूप आवडले असते. पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

हेही वाचा 

Back to top button