Microsoft : मायक्रोसॉफ्ट भारतातील 20 लाख जणांना देणार कृत्रिम बुद्धमत्तेचे धडे | पुढारी

Microsoft : मायक्रोसॉफ्ट भारतातील 20 लाख जणांना देणार कृत्रिम बुद्धमत्तेचे धडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मायक्रोसॉफ्ट 2025 पर्यंत भारतातील 20 लाख जणांना एआयचे धडे देईल, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी दिली आहे. ते दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. (Microsoft)

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) जगभरात वेगाने प्रसार होत आहे. आर्थिकवाढ करण्यासाठी या तंत्राचा अवलंबही त्वरित करायला हवा. त्यासाठी भारत-अमेरिकेने परस्परांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मुंबईत झालेल्या विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली. या मेळाव्यामध्ये भारत आणि अमेरिका एआयबाबत सहकार्य करू शकतात काय, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मायक्रोसॉफ्ट 2025 पर्यंत भारतातील 20 लाख जणांना एआयचे धडे देणार आहे. भारतीय बाजारपेठ वेगाने वाढत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 2025 पर्यंत (जीडीपी) 5 लाख कोटी डॉलरवर जाईल. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यात एआयचा वाटा 500 अब्ज डॉलर असेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात चार मोठे बदल झाले आहेत. त्यात वैयक्तिक संगणक, सर्व्हर, इंटरनेट, मोबाईल आणि क्लाऊड. एआय स्वीकारण्यात जग आणि भारतातील अंतर उरले नाही, असे पहिल्यांदा घडत असल्याचे ते म्हणाले. (Microsoft)

Back to top button