रेल्वेचे 40 हजार डबे ‘वंदे भारत’च्या दर्जाचे | पुढारी

रेल्वेचे 40 हजार डबे ‘वंदे भारत’च्या दर्जाचे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सध्या धावणार्‍या सामान्य रेल्वे गाड्यांचे 40 हजार डबे ‘वंदे भारत’च्या दर्जाचे बनवले जातील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडताना केली. अर्थात, या गाड्या वंदे भारत म्हणून रूपांतरित केल्या जाणार नाहीत, हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रस्त्यांप्रमाणे रेल्वेसाठी कॉरिडोर बनवण्यात येणार आहे. यांतर्गत ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडोर, बंदरांना जोडणारा कॉरिडोर, प्रचंड रहदारी नियंत्रित करणारा असे तीन कॉरिडोर उभारले जाणार आहेत. याचा उल्लेख सीतारामन यांनी यावेळी केला. पीएम गतिशक्ती योजनेखाली उभारल्या जाणार्‍या या कॉरिडोरमुळे रेल्वेच्या खर्चात बचत होणार असून, कार्यक्षमताही वाढणार आहे. गेल्यावर्षी 5,200 कि.मी.चे नवे रेल्वेमार्ग उभारण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले. पूर्ण स्वित्झर्लंड देशाइतके हे रेल्वेचे जाळे केवळ एका वर्षात पूर्ण करण्यात आले आहे. देशात दरदिवशी 15 कि.मी.चे रेल्वेमार्ग बनत आहेत. यासाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 77 टक्के निधी खर्ची पडला आहे.

भारताने बनवलेल्या ‘कवच’ तंत्रज्ञानाचा वापर आता उ. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि आग्नेय आशियातही होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या ‘कवच’मध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. मेट्रो, नमो भारतला बळ दिले जात आहे. खासगी क्षेत्र यामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे.

सध्या मेट्रोच्या माध्यमातून रोज एक कोटी लोक प्रवास करतात. 895 कि.मी.चा मेट्रो मार्ग 20 शहरांत कार्यरत आहे. याशिवाय 986 कि.मी.चा मेट्रो मार्ग उभारणी प्रगतिपथावर आहे. जगातील दुसरे सर्वात मोठे मेट्रो जाळे भारतात असल्याचे सीतारामन यांनी यावेळी नमूद केले. रेल्वेच्या भांडवली खर्चात 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेसाठी 19,575 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, 1,978 कि.मी. लांबीचे जाळे उभारण्यात येत आहे. तसेच या विभागाचे 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button