मुंबईतील ‘मविआ’च्या चार जागा ठाकरे गटाला

मुंबईतील ‘मविआ’च्या चार जागा ठाकरे गटाला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या गुरुवारी झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत मुंबईतील सहापैकी चार ठाकरे गट, तर दोन जागा काँग्रेस लढविणार असल्याचे ठरले आहे. दरम्यान, राज्यातील लोकसभेच्या काही जागांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सांगली, कोल्हापूरच्या जागांवर काँग्रेस पक्ष आग्रही आहे. 30 जानेवारीच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील सहापैकी एकही जागा शरद पवार गटाला मिळालेली नाही. त्यांनी ईशान्य मुंबईची जागा मागितली होती. परंतु, ती न मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजीचा सूर या बैठकीत काढला. याबरोबरच राज्यातील काही जागांवर अजूनही मतभेद आहेत. 30 जानेवारीच्या बैठकीत यावर पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

जागावाटपाबाबत दिल्लीत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक गेल्या आठवड्यात झाली होती. त्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाला प्रत्येकी 20, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला आठ जागा देण्याचे प्राथमिक स्तरावर ठरले होते. मात्र, या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा झाली नव्हती. याबाबतचे अधिकार राज्यातील नेत्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

मुंबईत काँग्रेसला दोन जागा

बैठकीच्या सुरुवातीला राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. सद्यस्थितीत कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद आहे, त्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेसने 23 मतदारसंघांवर दावा केला. ठाकरे गटाने 24 मतदारसंघांवर दावा केला आहे. शरद पवार गटाने 14 मतदारसंघांवर आपला दावा ठोकला आहे. मुंबईत ठाकरे गटाने पाच जागांवर दावा केला होता. त्यातील चार जागा कोणत्याही परिस्थितीत मिळाल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी बैठकीत घेतली; तर काँग्रेसनेही चार मतदारसंघांवर दावा केला. परंतु, चर्चेअंती दोन जागांवर काँग्रेसने तडजोड केली.

सांगलीसाठी काँग्रेस आग्रही

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेसने हट्ट धरला आहे. सांगली, सोलापूर या जागाही काँग्रेसने मागितल्या आहेत. पवार गट मावळ, शिरूर, सातारा आणि बारामती या जागा लढविणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन जागा ठाकरे गटाला देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले आहे.

विदर्भात रामटेक, अमरावतीवर काँग्रेसचा दावा

काँग्रेसने विदर्भात सर्वाधिक जागांची मागणी केली आहे. यातील रामटेक, अमरावती या मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र, ठाकरे गटाने प्राथमिक बैठकीत तरी या जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. गोंदिया आणि अमरावती हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने मागितले आहेत. मराठवाड्यात हिंगोली, औरंगाबाद या जागांवर मतभेद आहेत. उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या जागेसाठी ठाकरे गटाने हट्ट धरला आहे. कारण, धुळे नंदुरबार या दोन जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. रावेरची जागा शरद पवार गटाने मागितली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news