‘एक शाळा, एक गणवेश’ रचना निश्चित | पुढारी

‘एक शाळा, एक गणवेश’ रचना निश्चित

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून एकाच रंगाचा गणवेश घालूनच शाळेत जावे लागणार आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतच्या मुले व मुलींच्या गणवेशाची रचना ठरवली आहे. यामध्ये इयत्ता 1 ली ते 4 थीपर्यंतच्या मुलींकरिता पिनो फ्रॉक, तर 8 वीमधील मुलींकरिता सलवार- कमीज आणि ओढणी तसेच मुलांकरिता फुल पँट व हाफ शर्ट असा गणवेश घालावा लागणार आहे.

नव्या निर्णयानुसार इयत्ता 1 ली ते 4 थीपर्यंतच्या मुलींकरिता पिनो फ्रॉक, 5 वी ते 7 वीपर्यंतच्या मुलींकरिता शर्ट व स्कर्ट आणि 8 वीमधील मुलींकरिता सलवार-कमीज व ओढणी तसेच, इ. 1 ली ते इ. 7 वीपर्यंतच्या मुलांकरिता हाफ पॅट व हाफ शर्ट व इ. 8 वीमधील मुलांकरिता फुल पँट व हाफ शर्ट याप्रमाणे गणवेशाची रचना असणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावर्षी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार येत्या 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना समान रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे.

असा असणार नवा गणवेश

नवा गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असणार आहे. तसेच सलवार गडद निळ्या रंगाचा व कमीज आकाशी रंगाची अशा स्वरूपात गणवेशाची रचना असेल. त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्टवर शोल्डर स्ट्रिप व दोन खिसे असणार आहे.

Back to top button