

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक झाली होती, त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे बंद कपाटात ठेवली होती. त्याची जबाबदारी देण्यात आलेली संबंधित माणसे पक्ष सोडून गेली आहेत. त्यामुळे त्यांनी ती कागदपत्रे काय केली हे माहीत नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाडांच्या या दाव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र सुनावणीत पहिल्याच दिवशी नवा द्विस्ट आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लवादासमोर सुरू झाली आहे. मंगळवारी सुनावणीच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटाच्या वकिलांबरोबरच शरद पवार गटाच्या वकिलांनीही आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा आणि राज्यस्तरीय निवडणुका झाल्या होत्या काय, असा प्रश्न अजित पवार गटाच्या वकिलांनी विचारला असता आव्हाड म्हणाले, निवडणुका झाल्या होत्या. माझ्या माहितीनुसार निवडणुकांबाबतची सर्व कागदपत्रे एका कपाटात बंद होती; पण ती आता गहाळ झाली आहेत. जे लोक सोडून गेलेत त्यांच्याकडे हे सर्व होते. पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचाच एकमेव अर्ज आला होता. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली, असेही आव्हाड यांनी सांगितले.