श्रीराम दर्शनाच्या आमिषाने महिलेला अडीच लाखाला गंडा | पुढारी

श्रीराम दर्शनाच्या आमिषाने महिलेला अडीच लाखाला गंडा

डोंबिवली : अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवत कल्याणकर गृहिणीला तिघांनी तब्बल 2 लाख 66 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला.

खडकपाडा परिसरात ही घटना घडली. याच भागात राहणारी 56 वर्षीय नोकरदार गृहिणी बुधवारी पायी जात होती. इतक्यात या गृहिणीला तिघा अनोळखींनी अडविले. आम्ही श्रीराम भक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो. मात्र, त्यासाठी तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, इतर सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा, असे या गृहिणीला सांगितले. श्रीरामाचे दर्शन घडणार असल्याने गृहिणीला आनंद झाला. या त्रिकुटाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गृहिणीने तिच्याकडील 2 लाख 66 हजारांचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळला. हा ऐवज कुणी चोरू नये म्हणून भामट्यांनी स्वतःजवळ घेतला. आपणास श्रीरामाचे दर्शन होत आहे या आनंदात गृहिणी होती. इतक्यात संधी साधून तिघांनी गृहिणीला एकाएकी सोडून तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाली आहे, याची खात्री पटल्यानंतर गृहिणीने खडकपाडा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.

Back to top button