‘एसटी’ सुरक्षेच्या मार्गावर; अपघात अन् मृतांच्या संख्येतही घट | पुढारी

‘एसटी’ सुरक्षेच्या मार्गावर; अपघात अन् मृतांच्या संख्येतही घट

सुरेखा चोपडे

मुंबई : एसटीचा प्रवास खर्‍या अर्थाने आता सुरक्षित होत आहे. वर्ष 2022-23 मध्ये एसटीचे 3 हजार 14 अपघात झाले होते. त्यात 343 जणांनी जीव गमावला होता. त्यात वर्ष 2023-24 मध्ये घट होऊन 2 हजार 286 अपघातांत 287 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जखमींच्या संख्येतदेखील घट झाली आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात 14 हजार 61 बसेस आहेत. त्याद्वारे 133 कोटी 34 लाख प्रवाशांनी वर्ष 2023-24 मध्ये प्रवास केला. 2023-24 मध्ये एसटीचे प्राणांतिक 245, गंभीर 995 तर किरकोळ 1 हजार 46 असे एकूण 2 हजार 286 अपघात झाले. त्यात 287 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एसटी बसमधील 21 प्रवासी, महामंडळाचे 8 कर्मचारी, 57 पादचारी आणि इतर 201 जणांचा समावेश आहे.

महामंडळाची कारवाई

एसटी चालवताना मोबाईलवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, व्हिडीओ पाहणे अशा चालकांवर निलंबनाची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाकडून उपक्रम राबवण्यात येतात.

महामंडळाची दक्षता

एसटीच्या अपघातांचे प्रमाण कमी असले तरी प्रत्येक चालकाला सुरक्षित वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. एसटीचा अपघात झाल्यावर चालक तणावात जातो. त्यामुळे त्याला 10 दिवस सुट्टी देण्यात येते. त्याचे समुपदेशन केले जाते. त्यामुळे एसटीच्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

Back to top button