सीमाभागातील मराठी रुग्णांनाही मुख्यमंत्री वैद्यकीय निधीचा आधार

सीमाभागातील मराठी रुग्णांनाही मुख्यमंत्री वैद्यकीय निधीचा आधार

मुंबई : ताजेश काळे : रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा मानून दुर्धर व गंभीर आजार जडलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी (Chief Minister's Relief Fund) कक्षातून गेल्या दीड वर्षांत तब्बल १८१ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. या आर्थिक मदतीमुळे २१ हजार गरीब रुग्णांचे प्राण वाचले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ८६५ गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक रुग्णांनाही अर्थसहाय्य देण्यास सुरुवात केली आहे.

मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून (Chief Minister's Relief Fund) तब्बल १६५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आल्याची माहिती या कक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी पुढारीला दिली. नागपूर येथील वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून १५ कोटी रुपयांची मदत गरीब रुग्णांना करण्यात आली. महाराष्ट्रातील रूग्णांसह आता कर्नाटक सीमेवरील ८६५ गावांमध्ये राहणाऱ्या मराठी बांधवांना देखील वैद्यकीय अर्थसहाय्य दिले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा भाग समन्वयक मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रकांत पाटील, सीमा भागातील उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून (Chief Minister's Relief Fund) रुग्णांना मदत मिळण्यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर एक कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज करा, असे आवाहन चिवटे यांनी केले. कर्नाटक सरकारचा विरोध झुगारून ८६५ गावांतील बांधवांना या योजनेचा लाभ दिला जात असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आनंद आपटेकर यांनी दिली.

माझ्या आईची हृदय शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी ४ लाख रुपये खर्च सांगितला होता. मी खासगी कंपनीत नोकरीला आहे. शस्त्रक्रियेसाठी पैशांची अडचण होती. तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती दिली. त्यामाध्यमातून आठ दिवसांत १ लाख रुपये मदत मिळाली. माझी आई आता एकदम ठणठणीत आहे. मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद, अशा शब्दांत बेळगाव येथील मारुती देसाई यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news