मी गद्दारांच्या घराणेशाहीवर घाव घालायला आलो आहे : उद्धव ठाकरे

मी गद्दारांच्या घराणेशाहीवर घाव घालायला आलो आहे : उद्धव ठाकरे

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : या देशाला एक परंपरा आणि संस्कृती आहे. या हिंदुत्वालादेखील एक परंपरा आहे. आपले हिंदुत्व हे बेगडी आणि ढोंगी नाही. आपण भाजपला त्यांच्या ढोंगामुळे सोडले. मात्र, हिंदुत्व सोडले नाही. ते सोडूही शकत नाही. मिंधे कुठे तरी मंदिर साफ करत आहेत. त्यांना ती सवयच आहे. मी गद्दारांच्या घराणेशाहीवर घाव घालायला आलो आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. या घडामोडींमुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकीय युद्ध रंगणार आहे.

ठाकरेंनी कल्याण येथे पक्ष कार्यालयाचे लोकार्पण करून उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. राम मंदिराच्या लढ्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे जरूर योगदान आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजपसोबत शिवसेनेची युती होती. सध्याच्या नेत्यांनी त्यांचे विचार सोडून दिले असून, ते जो विचार घेऊन पुढे चालले आहेत ते हिंदुत्व मला मान्य नाही. या भगव्याला कलंक लावणारी गद्दारांचा गट महाराष्ट्रात पुन्हा वळवळता कामा नये, असा टोला ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. यावेळी खा. संजय राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

काळाराम मंदिराचे राष्ट्रपतींना आमंत्रण देणार

अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'मातोश्री' निवासस्थानी ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. 22 जानेवारीला आम्ही नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असून, गोदावरीची आरतीही करणार आहोत. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपतींनाही निमंत्रण पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news