

परळी वैजनाथ : आपल्या प्रतिभावान कवितांनी संपूर्ण देशालाच प्रभावित करणारा एक कवी सध्या युट्यूब वर लोकप्रिय झाला आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या कवीने 'राम' नावाची केलेली कविता सध्या प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. या कवितेने अक्षरश: लाखो दर्शकांना भूरळ पाडली आहे. (Ram Poem By Abhi Munde)
परळी तालुक्यातील वानटाकळी हे मूळगाव असलेला अभि मुंडे नावाचा हा युवक कवी सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असून तो स्वतःला 'सायको शायर' असे म्हणून घेतो. या नावानेच तो चॅनलही चालवतो. या चॅनलवरील अनेक रचना, कविता यापूर्वीही प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. येत्या 22 जानेवारी रोजी अनेक तपांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची चर्चा देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर होत आहे. या अनुषंगानेच सध्या यूट्युब वर राम नावाचे एक काव्य प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यामधील कवी अभि मुंडे हे स्वतः या कवितेचे सादरीकरण करताना दिसतात कवितेचा शब्द ना शब्द आणि सादरीकरणातीले भाव हे दर्शकांना आकर्षित करून जातात. (Ram Poem By Abhi Munde)
अभि मुंडे यांचे नाव अभिराम बाळकृष्ण मुंडे असून, त्यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील वानटाकळी हे आहे. मात्र त्यांची जडणघडण अंबाजोगाई येथे झालेली आहे. ही बाब केवळ परळी- अंबाजोगाई करांसाठीच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यांचे वडील पंधरा वर्षे एसआरपीएफ म्हणून शासकीय सेवेत होते. सध्या ते महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत आहेत. अभि मुंडे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले. तर अभियांत्रिकीचे शिक्षण जळगाव येथे पूर्ण झाले. त्यांनी बी. टेक पदवी प्राप्त केली आहे. (Ram Poem By Abhi Munde)
घरात कलाक्षेत्राचा कुठलाही वारसा नसताना आपल्या प्रतिभेने त्यांनी जनमानसावर गारुड निर्माण केले आहे. स्वयंप्रेरणेने कवितेची रचना करणे उर्दू व हिंदीसाठी वेगवेगळ्या शायरी, कविता, मुशायरा ऐकण्याची आवड होती. उर्दू आणि हिंदी भाषेसाठी त्यांचे मित्र मोहम्मद युनुस यांची मदत झाली. हळूहळू हिंदी आणि उर्दू भाषेची गोडी वाढत गेली आणि ते नजमा लिहित गेले. त्या नजमा लोकांना आवडू लागल्या. पुढे दीर्घ स्वरूपाच्या कविता लिहत गेले. त्याचबरोबर लिहिलेल्या कविता यूट्यूब च्या माध्यमातून अभिनयासह सादर करू लागले. या प्रयत्नास रसिकांनी खूप मोठी दाद दिली.
अभिच्या 'सायको शायर ' या यूट्यूब चॅनलचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. 'राम' या लोकप्रिय कवितेपूर्वी अभि मुंडे यांनी सादरीकरण केलेली 'संपूर्ण कर्ण' आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र काव्य स्वरूपात 'शंभूगाथा' नावाने प्रसारित झाले होते. 'कर्ण' आणि 'शंभूगाथा' या रचनांनाही रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. राम ही कविता त्यांनी 25 डिसेंबरला अपलोड केली. 29 तारखेपर्यंत सहा लाखांवर दर्शकांनी कविता पाहिली व प्रतिक्रिया दिल्या. कवीचा अविर्भाव व काही शब्द रचना या डाव्या विचारांशी जुळल्या आहेत, असा मतप्रवाहही त्यांच्या या कवितेबद्दल उमटला आहे.
राम नेमका कसा आहे. तो आपण लोकांपुढे मांडावा असे ठरवले होते. योगायोगाने प्रभू श्रीराम जन्मभूमीत भव्य दिव्य सोहळा होणार आहे मग यापेक्षा दुसरा मोठा योगा योग असू शकत नाही. म्हणून मी प्रभू श्रीरामावर कविता लिहिली. ती हिंदी भाषेतून आणि माझ्या यूट्यूब चैनल वर अभिनयासह सादर केली. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त ही कविता लोकांना आवडली. आणि ती कविता देशभर व्हायरल झाली. रसिक श्रोते यांचा प्रतिसाद व दर्शकांचे प्रेम माझ्या कवितांना मिळत असल्याचे बघून आनंद वाटतो असे अभि मुंडे यांनी सांगितले.
हाथ काट कर रख दूंगा
ये नाम समझ आ जाए तो
कितनी दिक्कत होगी पता है
राम समझ आ जाए तो
राम राम तो कह लोगे पर
राम सा दुख भी सहना होगा
पहली चुनौती ये होगी के
मर्यादा में रहना होगा
और मर्यादा में रहना मतलब कुछ खास नहीं कर जाना है..
बस..
बस त्याग को गले लगाना है और
अहंकार जलाना है