सिल्लोड,पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा गेल्या सव्वा महिन्यांपासून संप सुरु आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत संपावर असलेल्या सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावून 24 तासात कामावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र याला बुधवारी (दि.10) सेविका, मदतनीस यांनी लेखी उत्तर देत संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा संप सुरु आहे. संपाला सव्वा महिना झाला. तरी अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांना पूरक पोषण आहार, शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण आहार, आरोग्य तपासणी, विविध लसीकरण आदी सेवा पुरवल्या जातात. ज्या संपामुळे सव्वा महिन्यांपासून बंद आहे. या संपावर तोडगा निघने गरजेचे होते. मात्र तोडगा न निघाल्याने राज्य शासनाने उलट संपावरील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 24 तासात कामावर हजर रहावे, अन्यथा कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाकडे पाठवण्यात येईल असे कळविले आहे.
प्रशासनाने दिलेल्या नोटिसामुळे संपावरील सेविका आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी लेखी उत्तर देत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी संघटनेच्या तालुकाध्यक्ष कॉ. संगिता अंभोरे, मीना वाघ, संगिता वाघ, कमल मानकर, गया इंगळे, भारती दांडगे, अंजना मोरे, सिमा सिनकर, रंजना दौड, मंगला दौड, मीरा बडक, कविता दांडगे आदींची उपस्थित होत्या.
तालुक्यात प्रकल्प 1, प्रकल्प 2 व मिनी अंगणवाडी अशा 463 अंगणवाड्या आहेत. यात सर्व अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस संपावर गेल्याने या अंगणवाड्या सव्वा महिन्यांपासून बंद आहे. अंगणवाडी मार्फत दिल्या जाणार्या पोषण आहार, शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण आहार अशा सुविधा बंद आहे. दरम्यान नोटीसीनंतर काही अंगणवाडी सेविका, मदतनीस कामावर रुजु झाल्याचे कळते.