छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची तयारी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आता 50 कुटुंबांमागे एक प्रगणक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येत्या आठवडाभरात राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकांना पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील जिल्हानिहाय प्रगणकांची यादी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. त्यानुसार, तज्ज्ञ प्रशिक्षकांची निवड केली जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या हालचाली जोमाने सुरू करण्यात आल्या आहेत. 4 जानेवारीला राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणाचे निकष निश्चित केले आहेत. हे सर्वेक्षण सात दिवसांत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या सर्वेक्षणादरम्यान दिडशेवर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट प्रश्नावलीचे सॉफ्टवेअर तयार करत आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने राज्यात सर्वेक्षणाच्या कामासाठी विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि शहरी भागासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारीत प्रत्येकी तीन नोडल अधिकारी घोषित केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण पुण्यात दिले जाणार आहे. त्यानंतर हे तज्ज्ञ प्रशिक्षक प्रगणकांना प्रशिक्षण देणार आहेत.
पुण्यातील संस्थेकडून एका दिवसात तज्ज्ञांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर निवडलेल्या प्रगणकांनादेखील तज्ज्ञांनी एकाच दिवसात प्रशिक्षण द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रगणकांच्या मदतीला पोलिस शिर्पाइ अथवा होमगार्ड देण्यात यावा अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. प्रगणकांचे यूजर आयडी तयार केले जाणार आहेत. त्या माध्यमातून सर्वेक्षणाची माहिती तज्ज्ञ प्रशिक्षकांना मिळणार आहे. त्यानंतर ती माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविली जाणार आहे.
जिल्ह्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी तीन तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या आधिपत्याखाली जिल्हाधिकारी, महानगरपालिकेतील 1488 कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रगणकांना एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सुमारे 1200, तर महापालिकेच्या 288 कर्मचार्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली