सीईटी नोंदणी झाली सोपी! प्रणालीमध्ये नवीन काय? वाचा सविस्तर | पुढारी

सीईटी नोंदणी झाली सोपी! प्रणालीमध्ये नवीन काय? वाचा सविस्तर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना आता वारंवार नोंदणी करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी एकदा नोंदणी केल्यावर त्याच लॉगिनमधून त्यांना सीईटी परीक्षांबरोबरच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. या नव्या नोंदणी प्रणालीचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन करण्यात आले.

प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्या समन्वयातून १६हून अधिक प्रवेश परीक्षांद्वारे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. कृषी, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण या संचालनालयांकडून प्रवेश प्रक्रियेचे नियोजन तयार करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबविले जाते. अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकीय आदी व्यावसायिक शाखांच्या पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जाते. यावेळी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागते. या नव्याने अद्यावत केल्या जात असलेल्या संकेतस्थळावर आता विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केल्यावर त्यांना प्रवेशावेळी पुन्हा नोंदणीची गरज पडणार नाही.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी. डांगे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे आयुक्त महेंद्र वारभुवन, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सीईटी सेल प्रशासकीय अधिकारी मंगेश निकम तसेच सीईटी सेलमधील विविध परीक्षा समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

प्रणालीमध्ये नवीन काय?

  • सीईटी सेलच्या संकेतस्थळामध्ये उमेदवारांसाठी मदत केंद्राव्यतिरिक्त टोकन स्वरूपात तक्रार नोंदविण्यासाठी प्रणाली तसेच प्रगती या चॅटबॉटची सोय.
  • लॉगिन आयडीचा वापर करून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येईल. तसेच भविष्यात पदव्युत्तर पदवीचेही प्रवेश घेता येणार आहे.

Back to top button