

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यांतील तलाठी पेपर फुटीवरून विरोधी पक्षांत संतापाचे वातावरण दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-पवार-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. तलाठी भरती घोटाळा लक्षात घेत, तलाठी भरती परीक्षा रद्द झालीच पाहीजे, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, तलाठी भरतीचा पेपर फोडून गोरगरीब कुटुंबातील पोरांचं स्वप्न पायदळी तुडवणारे राजरोस फिरत आहेत. अन् गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही दोषींवर कारवाई करायचं सोडून या पोरांना पुरावे द्यायला सांगताय… हा 'चोराच्या उलट्या बोंबा' असा प्रकार नाही का? की तुम्हाला तुमची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी हा घोटाळा बाहेर येऊ द्यायचा नाही. आज राज्यातील युवा तुमच्यातील #सुपरफास्ट_देवाभाऊ ला हाक देतोय आणि तुम्ही मात्र त्याला 'हात दाखवताय' हे योग्य नाही…
भरती परिक्षेसाठी हजार रुपये वसुली करणारे तुम्ही…पेपर फोडणाऱ्यांना पाठीशी घालणारेही तुम्हीच…पोरांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारेही तुम्हीच..आणि पेपरफुटीचा पुरावा मागणारेही तुम्हीच…सरकारचा हा कसला अजब न्याय? असा सवाल करत, देवाभाऊ…. अजब तुमचं हे सरकार! असे मिश्किल टीका देखील आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून पोस्ट शेअर करत आहे.