NCP Disqualification Case : राष्ट्रवादीवरील दावेदारीसाठी १२ दिवसांची कायदेशीर लढाई! सुनावणीचे वेळापत्रक तयार | पुढारी

NCP Disqualification Case : राष्ट्रवादीवरील दावेदारीसाठी १२ दिवसांची कायदेशीर लढाई! सुनावणीचे वेळापत्रक तयार

मुंबई : गौरीशंकर घाळे – राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अवघ्या बारा दिवसांच्या प्रत्यक्ष कामकाजात ‘राष्ट्रवादी आमचीच’, हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाचे वकील विधिमंडळात कायदेशीर लढाई लढणार आहेत. (NCP Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यालयाने अंतिम केलेल्या सुनावणीच्या वेळापत्रकानुसार ६ ते २७ जानेवारी या कालावधीत अपात्रता याचिकांवरील सर्व कामकाज पूर्ण केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या याचिकांवर फैसला करण्याचे निर्देश विधानसाध्यक्षांना दिले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या कालावधीत कामकाज पूर्ण करण्याचा राहुल नार्वेकरांचा मानस आहे. (NCP Disqualification Case)

शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील निकालासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत. १० जानेवारी पर्यंत विधानसभाध्यक्ष नार्वेकरांकडून शिवसेनेबाबतचा निकाल जारी केला जाण्याची शक्यता आहे. या निकालाची प्रतीक्षा असतानाच आता राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवरील सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. याच वेळापत्रकासाठी गुरुवार, ४ जानेवारीला विधानभवनात पहिली सुनावणी घेण्याचे ठरले होते. मात्र, नार्वेकरांची तब्येत बिघडल्याने ही सुनावणी रद्द करण्यात आली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने वेळापत्रक अंतिम केले असून ते दोन्ही गटांना पाठविण्यात आले आहे.

असे असेल कामकाजाचे वेळापत्रक –

६ जानेवारी – राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.

८ जानेवारी – याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.

९ जानेवारी – फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, ९ तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

११ जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल.

१२ जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

१४ जानेवारी – सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.

१६ जानेवारी – विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

१८ जानेवारी – प्रतिज्ञापत्र सादर करणे.

२० जानेवारी – अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२३ जानेवारी – शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२५ आणि २७ जानेवारी – राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद

Back to top button