

मुंबई : कारागृहांमधील कैद्यांची संख्या कमी करून त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालघर, पुणे, ठाणे, नगर, हिंगोली, जळगाव आणि गोंदिया येथे 7 नवीन कारागृहे उभारण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती राज्याचे तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दै. 'पुढारी'ला दिली.
गुप्ता म्हणाले की, पालघरमध्ये 25 एकर जागेवर 1500 कैद्यांना ठेवण्याची क्षमता असणारे मध्यवर्ती कारागृह उभारले जात आहे. नगर जिल्ह्याच्या नारायणडोह गावात 500 कैद्यांच्या क्षमतेचे जिल्हा कारागृह – वर्ग 1 बांधले जात आहे. या कामांसाठी तब्बल 418 कोटी 82 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुण्यातील येरवडा कारागृह परिसरात अस्तित्वात असलेल्या सुमारे 75 एकर जागेवर 3 हजार कैद्यांच्या क्षमतेचे नवीन मध्यवर्ती कारागृह उभारले जाणार आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृह परिसरात 5 एकर जागा उपलब्ध आहे. या जागेवरही कारागृह बांधले जाणार आहे. हिंगोली येथील 42 एकर जागेवर 500 कैद्यांच्या क्षमतेचे जिल्हा कारागृह बांधण्याचे नियोजन आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये 20 एकर जागेवर 350 कैद्यांच्या क्षमतेचे कारागृह बांधले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात 21 एकर जागेवर 500 कैद्यांच्या क्षमतेचे जिल्हा कारागृह उभारले जाईल.