अजित पवार- शिंदे गटात रस्सीखेच; लोकसभेच्या जागावाटपावरून दोन्ही गट आक्रमक | पुढारी

अजित पवार- शिंदे गटात रस्सीखेच; लोकसभेच्या जागावाटपावरून दोन्ही गट आक्रमक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षांकडूनदेखील निवडणुकीची जय्यत तयारी केली जात आहे. सत्ताधारी दोन पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे समजते.

महाराष्ट्राने गेल्या चार ते पाच वर्षांत अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला एक अनोख्या युतीचे सरकार बघायला मिळाले. त्यानंतर अडीच वर्षांनी जे घडले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. तेव्हापासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडी काही थांबायचे नाव घेताना दिसल्या नाहीत. सातत्याने धक्क्यावर धक्के देणार्‍या राजकीय घडामोडी घडत गेल्या. या सरकारमध्ये आणखी एक विरोधी बाकावरचा सहकारी पक्ष सत्तेत सहभागी झाला आणि सत्ताधार्‍यांचा समान वाटेकरी बनला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या गटाच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यात सत्तांतर होऊन सव्वा वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे; पण अद्यापही मंत्रिमंडळाचा रखडलेला दुसर्‍या टप्प्यातील विस्तार पार पडलेला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. पण त्याआधी आता लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जितक्या जागा शिंदे गटाला देणार, तितक्याच जागा आम्हाला द्या, अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात, असे स्वत: अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कॅमेर्‍यासमोर स्पष्ट म्हटले आहे.

छगन भुजबळ नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सुरू असलेल्या या घडामोडींवर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी जागावाटपांबाबत त्यांचे मत मांडले आहे. शिंदे गटाचे जेवढे जवळपास आमदार आले आहेत तेवढेच अजित पवार गटाचे आमदार आले आहेत. त्यामुळे सारासार विचार करता, त्यांच्याप्रमाणे आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे, असे मत मांडले तर चुकीचे नाही. ते मत बरोबर आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.

अमित शहांच्या उपस्थितीत शिंदे-अजित पवारांची बैठक होणार

सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार आहेत, तर शिंदे गटाचे 13 खासदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जागावाटपासाठीची बैठक होणार आहे. लोकसभाबरोबरच विधानसभा निवडणुकीतही अजित पवार गट समसमान जागा वाटपासाठी आग्रही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button