

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची निवड झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने देशातील व्यवस्थेपुढे हताश होत, पुन्हा कधीही कुस्ती न खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. देशातील अशा व्यवस्थेमुळे ऑलिम्पिक विजेता खेळाडूला तिचा खेळ सोडावा लागला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी एकनाथ खडसे यांनी "काय दोष तिचा?" असे म्हणत सरकारवर हल्ला चढवला. (Rohini Khadse On Sakshi Malik Retirement)
रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, एक महिला खेळाडू… जिने देशासाठी ऑलम्पिकमध्ये पदक मिळविले, तिची कारकिर्द अशी समाप्त होतेय याचे मनस्वी दु:ख आहे. काय दोष तिचा? पदाधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाविरोधात न्याय मागितला हा? असा सवाल खडसे यांनी व्यवस्थेला केला आहे. व्यवस्थेपुढे हाताश होत खेळातून निवृत्ती पत्करलेल्या या साक्षी मलिक यांचा प्रत्येक अश्रू सद्यस्थितीची कहाणी सांगतोय, असे देखील त्यांनी म्हटले आहे. (Rohini Khadse On Sakshi Malik Retirement)
दरम्यान, विरोधी पक्षाच्या निलंबित खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले. दरम्यान, एका तृणमूल काँग्रेस खासदारांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याचे चित्रिकरण केले. यावरून गेले दोन दिवस जाट समाजाच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी या जाट समाजाच्या मुलीबद्दल एक शब्द उच्चारला नाही. इतकी दहशत? सत्तेतून आलेल्या या निगरगठ्ठपणाला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे रोहिणी खडसे यांनी जाट समाजातील जनतेला सुनावले आहे.
संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा 40 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला. कुस्ती महासंघाची निवडणूक गुरुवारी (20 डिसेंबर) पार पडली. त्यानंतर लगेचच मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. प्रदीर्घ काळ महासंघावर राज्य करणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंह यांचे ते निकटवर्तीय आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे का होईना, भारतीय कुस्तीत ब्रिजभूषण यांचा दबदबा कायम राहिला आहे. डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षपदासह एकूण 15 पदांसाठी ची गुरुवारी (21 डिसेंबर) निवडणूक झाली. त्यानंतर लगेचच मतमोजणी पार पडली. यात संजय सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव करत बाजी मारली.