शरद पवारांचे निकटवर्तीयच मनोज जरांगे यांचे मार्गदर्शक : नितेश राणे | पुढारी

शरद पवारांचे निकटवर्तीयच मनोज जरांगे यांचे मार्गदर्शक : नितेश राणे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांचे निकटवर्तीय प्रदीप साळुंखे हे मनोज जरांगे यांना मार्गदर्शन करतात. जरांगेंची स्क्रिप्ट कोण लिहून देतो हे आम्हाला माहीत आहे, अशा शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी निशाणा साधला.

मराठा आरक्षणासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून जरांगेंना आमचा पाठिंबा आहे. पण ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करणार असतील तर आम्हालाही बोलावे लागेल, असा इशारा राणे यांनी ‘पुढारी न्यूज’च्या ओपन फोरमध्ये दिला. दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दिशा आणि सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातही सचिन वाझे याचा संबंध होता, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यावेळी पुरावे नष्ट करण्यात आले. त्यात सचिन वाझे कार्यरत होता. त्यामुळेच त्याचीही चौकशी करावी अशी मागणी करू, असे नितेश राणे यांनी सांगितले.

या दोन्ही प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले, असा दावा राणे यांनी केला आहे. आपल्याकडे त्याबाबतचे पुरावे असून आपण ते पोलिसांच्या एसआयटीसमोर सादर करू, एसआयटी पारदर्शी तपास करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माझ्या मुलाला सांभाळून घ्या : उद्धव यांचा नारायण राणेंना फोन

उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना दोनदा फोन केला होता. माझ्या मुलाला सांभाळून घ्या, असे त्यांनी फोनवरून सांगितल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. आदित्य ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले तर आपल्यालाही बोलावून समोरासमोर चौकशी करण्याची मागणी आपण करू, असे राणे म्हणाले.

Back to top button