

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक आणि मुंबईत घडलेल्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सलाम मीरा शेख उर्फ सलीम कुत्ता हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच्या एका कथित पार्टीतील व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अंडरवर्ल्डमधील दाऊद टोळीतील अत्यंत निर्दयी गैंगस्टर (रानटी कुत्रा) म्हणून त्याची सलीम कुत्ता अशी ओळख होती. दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोटा शकील सोबत तो गुन्हेगारी कारवाया करत होता. सलीम कुत्ता हा मुळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबाद परिसरातील कन्हेडी गावचा रहिवासी होता. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटासाठी लागणारी शास्त्रात्रे, स्फोटके उतरवण्यासाठी टायगर मेमन याच्यासोबत सलीम कुत्ता सामील होता. तो या बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसा याच्यासोबत राहायचा. बॉम्बस्फोटासाठी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये सलीम कुत्ता हजर राहायचा. त्यानेच दिलेल्या जबाबावरून डोसाला आरोपी बनवण्यात आले होते.
दिघी, शेखाढी येथे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहोचवण्यात आपला सहभाग होता. मुंबईत शस्त्रास्त्रे सुरळीत पोच व्हावी यासाठी काही कस्टम्स आणि पोलीस अधिकाऱ्यांना डोसाने लाच दिली होती. तेव्हा मी तेथे उपस्थित होतो, असे कुत्ता याने कबुली जबाबात म्हटले होते. त्यामुळे १९९३ च्या बॉम्बस्फोटात वापरली गेलेली शस्त्रे आणि दारूगोळा वाटपाच्या कटात भाग घेतल्याच्या आरोपांखाली सलीम कुत्ताला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सलीम शेख याच्या विनंतीवरुन विशेष टाडा न्यायालयाने न्यायालयाच्या रेकॉर्डमधून 'कुत्ता' हे आक्षेपार्ह नाव वगळण्याचे मान्य केले होते.
कुख्यात दाऊद इब्राहिमने भारत सोडल्यानंतर त्याचे साम्राज्य त्याची बहीण हसिना पारकर सांभाळू लागली. प्रतिस्पर्धी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी टोळीने हसीना पारकरचा नवरा इस्माईल याला ठार मारले होते. गवळीचा खास शूटर शैलेश हळदणकर याच्यावर हत्येचा आरोप होता. तो उपचारासाठी जे जे सृणालयात दाखल असताना इस्माईलच्या हत्येचा बदला घेण्यात आला. हळदणकरच्या हत्येचा आरोप दाऊदचा सर्वात विश्वासू शूटर सलीम कुत्तावर होता. यानंतर त्याची दहशत इतकी वाढली होती की, तो छोटा शकीलच्या साथीने गुन्हे करत असल्याचे बोलले जाते.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सलीम कुत्ता याला साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केल्यानंतर त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आणले होते. सन २०१६ मध्ये जेव्हा तो पॅरोलवर कारागृहाबाहेर आला होता, तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये एका ठिकाणी पार्टी आयोजित करून त्याठिकाणी सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य काही लोक पार्टीत सहभागी झाल्याचे व्हिडीओमधून दिसते.
पार्टीच्या ठिकाणी सलीम कुत्ता हा रेंज रोव्हर कारमधून पोहोचल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सलीम कुत्ता याच्या पॅरोल रजेच्या शेवटच्या दिवसाच्या रात्री या पार्टीचे आयोजन केल्याचे बोलले जाते. दरम्यान, व्हिडीओमध्ये आणखी कोण आहेत, याचा तपास करण्याचे काम गुन्हे शाखेकडून केले जात आहे.
सलीम कुत्ता हा मुळचा उत्तर प्रदेश येथील असून, त्याचे जवळचे नातेवाईक नाशिकमध्ये वास्तव्यास होते, अशीही माहिती समोर येत आहे. नाशिकरोड, उपनगर परिसरात त्याचे नातेवाईक वास्तव्यास होते. त्यामुळे त्याचे नाशिकमध्ये येणे जाणे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
पार्टीचा जो व्हिडीओ समोर आला आहे, तो व्हिडीओ नाशिकमधील आडगाव परिसरातील असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. ही पार्टी मध्यरात्रीपर्यंत रंगल्याचेही समोर येत असून, यामध्ये विविध पक्षांचे नेते सहभागी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकमधील एका व्यावसायिकाने या पार्टीचे आयोजन केल्याची माहिती सूत्रांकडून समजते.