आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार | पुढारी

आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. मात्र, हा निर्णय आणखी लांबण्याची शक्यता आहे. नार्वेकर हे आपला निर्णय देण्यासाठी सुप्रीम कोर्टाला आणखी दोन ते तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची विनंती करणार आहेत. त्यासंबंधी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना त्यांनी पत्र पाठविल्याचे समजते.

आमदार अपात्रतेची सुनावणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशात पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र अध्यक्षांना विविध कागदपात्रांची तपासणी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी अपेक्षित आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे विधानसभा अध्यक्षांच्या वतीने निर्णय देण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती करू शकतात, अशी माहिती विधिमंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. नार्वेकर यांनी आत्तापर्यंत 20 वेळा सहा तासापेक्षा जास्त काळ सुनावणी घेतली आहे.

हिवाळी अधिवेशनातही त्यांनी सुनावणी सुरू ठेवली आहे. ही सुनावणी अधिवेशनात 18 ते 20 तारखेपर्यंत पूर्ण होईल. मात्र अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाकडून 34 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातून 2 लाख 67 हजार पानांचे दस्तावेज जमा करण्यात आले आहेत. निकाल देताना या कागदपत्रांचा अभ्यास करणेही आवश्यक आहे. हे काम उरलेल्या दिवसांत शक्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सुनावणीला गती देण्यात आली. दिवाळीत आणि अधिवेशन काळातही ही सुनावणी झाली.

Back to top button