शिंदेंनी मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला | पुढारी

शिंदेंनी मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यासाठी पक्ष व पक्षाच्या कार्यकर्त्यांना पणाला लावल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शनिवारी केला. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी हा दावा फेटाळताना उद्धव ठाकरे हे पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना भेटीसाठी वेळच देत नव्हते, असा आरोप केला.

शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शनिवारी सुनावणी झाली. सुरुवातीला शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवली. महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय लोकांना आवडलेला नाही. भाजपसोबत युती करून आपण निवडणुका जिंकल्या आहेत. 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण पुन्हा एकदा भाजपसोबत जायला हवे, अशी भूमिका शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर 25 जून 2022 पूर्वीच मांडली होती. त्यावर विचार करण्याचे आश्वासन ठाकरेंनी दिल्याचा दावा शेवाळे यांनी यावेळी केला. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सुमारे 75 प्रश्न विचारत शेवाळे यांची उलटतपासणी घेतली.

या उलटतपासणीत एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद, त्यांची मुख्य नेतेपदी झालेली निवड, शिवसेनेची घटनादुरुस्ती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका बोलवण्याच्या मुद्द्यांवर शेवाळे यांची उलटतपासणी झाली.

राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी विनंती माझ्यासह अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे राहुल शेवाळे यांनी उलटतपासणीत सांगितले. मात्र या बैठकीसाठी त्यांनाच का विनंती केली, त्यांच्याकडे असा कोणता अधिकार होता, या उपप्रश्नावर मात्र शेवाळे यांचा गोंधळ उडाला. सगळेच तशी मागणी करत होते म्हणून मीही तशी मागणी केल्याचे ते म्हणाले. शिवाय बाळासाहेबांच्या काळापासूनची ही पद्धत असल्याचेही शेवाळे म्हणाले. मात्र त्याचवेळी 1999 पासून ही पद्धत बंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांची 18 जुलै 2022 रोजी पक्षाचा मुख्य नेता म्हणून निवड झाल्याचे राहुल शेवाळे यांनी आपल्या उलटतपासणीत सांगितले. मात्र पक्षाच्या घटनेत हे पद कुठे आहे का, या प्रश्नावर तशी घटनादुरुस्ती करण्यात आल्याचे सांगितले.

कामत यांचा मराठी प्रश्नांवर आक्षेप

शेवाळे यांची साक्ष नोंदविताना शिंदे गटाचे वकील अनिल साखरे हे उलटतपासणीतला मुख्य प्रश्न सूचक पद्धतीने विचारत असल्याचा आरोप ठाकरेंच्या वकिलांनी केला. शिवाय साखरे हे मराठीत प्रश्न विचारत असल्याचाही आक्षेप घेतला. त्यावर साखरे यांनी मराठीत प्रश्न का नाही विचारायचे? हा महाराष्ट्र आहे आणि मराठी आमची मातृभाषा आहे, असे कामत यांना सुनावले.

Back to top button