Rajasthan Election Result : राजस्थानात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार पराभूत

Rajasthan Election Result : राजस्थानात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार पराभूत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राजस्थानमध्ये उमेदवारी दिलेले एकमेव उमेदवार व माजी राज्य मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे उमेदवाराच्या या प्रचारासाठी म्हणून राजस्थानात गेलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ आली होती.

राजस्थानमधील गहलोत सरकारमध्ये पंचायत राज्य आणि ग्रामविकास राज्य मंत्री असलेले राजेंद्र गुढा यांनी मंत्री पदावर असतानाच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर कठोर टीका केली होती. मणिपूरमध्ये जसे महिलांवर अत्याचार होत आहेत, तसेच अत्याचार राजस्थानमध्येही महिलांवर होत असल्याचा आरोप करून त्यांनी सरकारला कोंडीत पकडले होते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याचाही त्यांनी आरोप केला होता. त्यानंतर गहलोत यांनी त्यांची जुलै महिन्यात मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. यानंतर त्यांनी आपल्याकडे एक लाल डायरी असून त्यात गहलोत यांच्या भ्रष्टाचाराची माहिती असल्याचा दावा केला होता.

राजस्थानात निवडणूक जाहीर झाल्यावर गुढा यांनी सप्टेंबरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उदयपूरवटी या विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली. यापूर्वी २०१८ मध्ये याच मतदारसंघातून त्यांनी बसपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. २०१८ मध्ये बसपच्या तिकिटावर गुढा यांच्यासह सहा आमदार निवडून आले होते. या सहाही आमदारांनी सप्टेंबर २०१९ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भाजपच्या बालमुकुंद आचार्य यांचा शिंदेंकडून प्रचार

राजेंद्र गुढा भाजपविरुद्ध लढत असल्याने शिंदे यांनी त्यांच्या प्रचाराला जाण्याचेच टाळले. याउलट त्यांनी जयपूरच्या हवामहल परिसरातून उभे असलेले योगी श्री बालमुकुंद आचार्य यांच्यासाठी प्रचारफेरी काढली.

तेलंगणात प्रचार केलेला एक उमेदवार विजयी एकनाथ शिंदे यांनी तेलंगणातील आदिलाबाद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पायलशंकर, तर धर्मपुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार एस. कुमार यांचा प्रचार केला होता. यापैकी पायलशंकर यांचा विजय, तर एस. कुमार यांचा पराभव झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news