Milk prices | ३.२ फॅट, ८.३ एसएनएफचे दूध स्वीकारले जाणार, फॅट निकषात बदल | पुढारी

Milk prices | ३.२ फॅट, ८.३ एसएनएफचे दूध स्वीकारले जाणार, फॅट निकषात बदल

 मुंबई : पुढारी वृत्तसेवा, राज्यात दुधाचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा देण्यासाठी दुधाची गुणवत्ता ठरविण्याचे स्निग्धांश (फॅट) आणि सॉलिड नॉट फॅट (एसएनएफ) चे प्रमाण ३.५/८.५ वरून ३.२/८.३ असे कमी केले आहेत. परंतु, दूध स्वीकारण्याचे निकष शासनाने जाहीर केले असले, तरी ३.२/८.३ गुणवत्तेच्या दुधाला किती दर देणार हे जाहीर करा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी केली आहे. (Milk prices)

राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांनी दूध खरेदी करताना प्रती लिटर किती दर शेतकऱ्यांना द्यावा, यासाठी दुधाची गुणवत्ता ठरवली गेली आहे. दुधाची गुणवत्ता फॅट आणि एसएनएफ यावरून ठरवली जाते. उत्तम प्रतिच्या दुधाचे हे प्रमाण राज्याने ३.५/८.५ असे निश्चित केले आहे. ३.५/८.५ या गुणवत्तेच्या प्रती लिटर दुधास ३४ रुपये दर देण्याचा निर्णय जुलै २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केले होते. मात्र, मागील आठवड्यात दूध दरप्रश्नी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दूध स्वीकारण्याच्या मानकात ३.५/८.५ वरून ३.२/८.३ असा बदल करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार निकषात सुधारणा करण्याचा निर्णय जारी करण्यात आला. (Milk prices)

Back to top button