शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड अवैध; शिंदे गटाच्या वकिलांचा दावा | पुढारी

शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड अवैध; शिंदे गटाच्या वकिलांचा दावा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सलग सहाव्या दिवशीच्या सुनावणीत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या निवडीवरून उलटतपासणी झाली. ठाकरे कुटुंब सोडून अन्य कुणाला पक्षप्रमुख होता येते का, शिवसेनेच्या घटनेत पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांवर कारवाईची तरतू्द आहे का, अशा प्रश्नांची सरबत्ती शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केली. त्यावर ठाकरे गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी रेकॉर्डवर आहे, हे खोटे आहे या मोजक्या शब्दांत उत्तरे दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्याबाबतचे कोणतेच पत्र ई-मेलद्वारे पाठविले नव्हते. याबाबत ठाकरे गटाने केवळ बनाव केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे केली आहे.

विधिमंडळात गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेची घटना, पक्षप्रमुखांची निवड, पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांना हटविण्याचे अधिकार, ठाकरेंशिवाय अन्य कुणाला पक्षप्रमुख होता येते का, या मुद्द्यांच्या अनुषंगाने उलटतपासणी झाली. यावेळी जेठमलानी यांनी शिवसेना पक्षाच्या पक्षप्रमुखपदी झालेली उद्धव ठाकरे यांची निवडच वैध नसल्याचा दावा केला. शिवसेनेची घटनाच अशा निवडीला परवानगी देत नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर हे खोटे आहे, इतकेच सांगत प्रभू यांनी अधिक भाष्य करणे टाळले. त्यांच्या या उत्तरांवर जेठमलानी यांनी अखेर सुनील प्रभू यांना माजी क्रिकेटपटू राहुल द्रवीडची उपमा देत दाद दिली. पक्षविरोधी कृत्यासाठी कारवाई करण्याआधी आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची वेळ दिली का, आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केले असेल, तर त्यांना हटवणे आवश्यक होते का, असे प्रश्न जेठमलानी यांनी केले. त्यावर, पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांना हटवणे आवश्यक असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. तर आमदारांना म्हणणे मांडण्यास वेळ दिला होता का, हे आठवत नसल्याचे उत्तर प्रभू यांनी दिले.

शिवसेनेची घटना ठाकरे कुटुंब सोडून इतर कोणालाही पक्षप्रमुख करू शकते का किंवा इतर कोणी पक्षप्रमुख पदावर बसू शकतो का, असा पेचात टाकणारा सवाल जेठमलानी यांनी केला. यावर रेकॉर्डवर आहे इतकेच उत्तर प्रभू यांनी दिले. तसेच शिवसेनेच्या घटनेनुसार नियुक्ती होते, प्रतिनिधी सभा बोलवून पक्षप्रमुख पदावर कोण असणार हेही ठरवले जात असल्याचे या संदर्भातील उपप्रश्नांच्या उत्तरात प्रभू यांनी सांगितले.

याशिवाय, 2013 च्या पक्षांतर्गत निवडणुकीत सुनील प्रभू यांनी मतदान केले नसल्याचा, किंबहुना ही निवडणूक झालीच नसल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. महापौर म्हणून प्रभूंना मतदानाचा अधिकार नव्हता, असे ते म्हणाले. त्यावर मी महापौर किंवा माजी महापौर म्हणून या सभेला उपस्थित होतो आणि मतदान केल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. यावर जेठमलानी यांनी 2018 ते 2023 पक्षांतर्गत निवडणुका झाला नसल्याकडे वकिलांनी लक्ष वेधले असता ही बाबही प्रभू यांनी फेटाळून लावली.

दरम्यान, शिवसेनेच्या विचारांविरोधी असलेल्या पक्षाशी युती तोडावी, हा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता, असा दावा जेठमलानी यांनी केला. हा दावाही खोटा असल्याचे प्रभू यांनी नमूद केले.

पक्षप्रमुख पदावरून झालेली साक्ष

महेश जेठमलानी : आपल्या मते शिवसेनेची घटना ही ठाकरे कुटुंब सोडून इतर कोणालाही पक्षप्रमुख करू शकते का? किंवा इतर कोणी पक्षप्रमुख पदावर बसू शकते का?
सुनील प्रभू : रेकॉर्डवर आहे.
जेठमलानी : शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार आपल्यासारख्या पात्र सदस्यालासुद्धा पक्षप्रमुख होता येऊ शकते का? या पदावर बसता येऊ शकते का?
प्रभू : घटनेमध्ये जे आहे त्यानुसार नियुक्ती
केली जाते.
जेठमलानी : शिवसेना पक्षाची घटना असे होऊ देईल का ?
प्रभू : प्रतिनिधी सभा बोलवून त्यामध्ये हे ठरवले जाते की, पक्षप्रमुख पदावर कोण असणार.
जेठमलानी : भारतीय संविधानातील दहाव्या अनुसूचीच्या अनुषंगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेना घटनेत काही तरतूद आहे का?
सुनील प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे.
जेठमलानी : आमदारांबाबत अपात्रता याचिका दाखल करण्याबाबत शिवसेनेच्या घटनेमध्ये कुठलीही तरतूद नाही हे खरे आहे का?
प्रभू : हो.
जेठमलानी : जिथंपर्यंत विधिमंडळ पक्षाचा संबंध आहे, तिथेपर्यंत सर्व निर्णय हे विधिमंडळ पक्षाच्या बहुमताने घेतले जातात. त्या प्रकरणात शिवसेना राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसतो.
प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : शिवसेना पक्षाची घटना शिवसेनेला तिच्या विचारांशी विरोधी असलेल्या पक्षाशी युती करण्याची अनुमती देते का?
प्रभू : हो.
जेठमलानी : शिवसेना नेत्यांनी बहुमताने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय घेतला की, आपण शिवसेना पक्षाच्या विरोधी विचार असलेल्या पक्षाशी युती तोडावी?
प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : 2018 ते 2023 दरम्यान शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत?
प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुखपदी झालेली उद्धव ठाकरे यांची निवड ही वैध नाही. कारण सेनेची घटना अशा प्रकारच्या निवडीला परवानगी देत नाही.
प्रभू : हे खोटे आहे.

Back to top button