Mumbai News : मराठी पाट्या नसल्यास आजपासून होणार कारवाई | पुढारी

Mumbai News : मराठी पाट्या नसल्यास आजपासून होणार कारवाई

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दुकानांवरील अन्य भाषेच्या पाट्या बदलून त्या मराठीत लावण्यासाठी दुकानदारांना पुरेसा वेळ देण्यात आला होता. परंतु अनेक दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्यास टाळाटाळ केल्यामुळे अशा दुकानदारांवर मंगळवार २८ नोव्हेंबरच्या सकाळपासून थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मराठी पाट्या नसलेल्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांची संख्या लक्षात घेऊन, प्रतिकामगार २ हजार रुपये या प्रमाणे दंड बजावण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मुंबईसह महाराष्ट्रात दुकान व अन्य आस्थापनांवर मराठी भाषेत बोर्ड लावण्याचे राज्य सरकारने बंधनकारक केले होते. मुंबई महापालिकेने याची अंमलबजावणी केली होती. मात्र कोर्टात प्रकरण गेल्याने मराठी बोर्डाची १०० टक्के अंमलबजावणी करता आली नाही. आता सुप्रीम कोर्टानेही मुंबईसह महाराष्ट्रात मराठी भाषेतच ठळकपणे पाट्या लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मराठी भाषेतच दुकानांवर पाट्या लावणे बंधनकारक झाले आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नाही, तर अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

Back to top button