नशेसाठी स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांची विक्री

नशेसाठी स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांची विक्री
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : नशेसाठी स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांची साठ आणि चौदा हजारामध्ये विक्री करणाऱ्या आरोपी माता-पित्यासह आठजणांच्या एका टोळीला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यानी अटक केली. शब्बीर शमशेर खान, सानिया शब्बीर खान, शकील मौलाबक्ष मकरानी, उषा अनिल राठोड, मणिकम्मा नरसप्पा भंडारी ऊर्फ अम्मा, वैशाली महेंद्र फगरिया ऊर्फ वैशाली राजेश जैन, शफीक हारुण शेख ऊर्फ साहिल आणि बाळकृष्ण भिकाजी कांबळे अशी या आठजणांची नावे आहेत.

यापैकी शब्बीर, सानिया आणि शकील या तिघांना स्थानिक न्यायालयाने बुधवार २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर इतर पाचजणांना शनिवारी किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. यातील काही आरोपींचा लहान मुलांचा खरेदी-विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंध असून या टोळीने आतापर्यंत मुंबईसह पालघर, तामिळनाडू आणि आंधप्रदेशात आठ लहान मुलांची खरेदी-विक्री केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पुढारीला सांगितले. त्यापैकी एका मुलीची सुटका करण्यात आली असून उर्वरित मुलांच्या सुटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे ते म्हणाले.

१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मुंबई पोलिसांनी हरविलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. याच मोहीमेत एका जोडप्याने त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांची नशेसाठी विक्री केल्याची माहिती वद्रि युनिटच्या अधिकाऱ्याना मिळाली. हे जोडपे वांद्रयात राहत असल्याचे समजताच त्यांच्या एका नातेवाईक महिलेच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती लागली.

या महिलेचा भाऊ शब्बीर व त्याची पत्नी सानिया हे दोघेही ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी ते दोघेही तिच्या घरी आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगा होता, दोन वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी मात्र सोबत नव्हते. तिने सानियाला विचारले असता तिने तिच्या दोन्ही मुलांना उषा राठोड आणि शकील मकरानी यांना अनुक्रमे ६० हजार आणि १४ हजारांमध्ये विकल्याची कबुली दिली. तपासातही हा व्यवहार निष्पन्न होताच डी. एन नगर पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला.

विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम, अतिरिक्त आयुक्त शशिकुमार मीना, उपायुक्त राज तिलक यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास वांद्रे युनिटकडे सोपविला. दया नायक व त्यांच्या पथकातील सचिन पुराणिक, दीपक पवार, संजय भोसले, उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, नरेंद्र पालकर, सुभाष शिंदे व अन्य पोलीस पथकाने अंधेरी आणि वांद्रे येथून शब्बीर, त्याची पत्नी सानिया आणि शकील मकरानी या तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर पाच साथीदारांची नावे समोर आली आणि विविध ठिकाणांहून उषा राठोड, माणिकम्मा भंडारी, वैशाली फगारिया, शफीक शेख आणि बाळकृष्ण कांबळे या पाचजणांना अटक करण्यात आली.

आरोपींचा पात्रपरिचय

शब्बीर व त्याची पत्नी सानिया यांनी दोन वर्षाच्या मुलासह नवजात मुलीची उषा आणि शकील यांना प्रत्येकी साठ आणि चौदा हजारामध्ये विक्री करून आलेले पैसे ड्रग्जवर उडवले.

लाईटमन असलेला शकील हा अंधेरीत राहतो, उषा ही अंधेरी येथे राहत असून तिनेच शब्बीरच्या दुसऱ्या मुलाची विक्री केली होती. मणिकम्मा ही वयोवृद्ध महिला अंधेरी येथे राहत असून ती इस्टेट एजंट आहे. उषाला मुलाची विक्रीसाठी तिनेच मदत केली होती.

वैशाली ही भायखळा येथे राहत असून तिचा स्वतःचा व्यवसाय आहे. रिक्षाचालक शकीफ व गार्बेज मोटार लोडिंगचे काम करणारा बाळकृष्ण हे दोघेही विरार येथे राहतात. वैशालीने चार तर शफीक व बाळकृष्ण यांनी पाचहून अधिक मुलांची खरेदी-विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

वैशालीने विक्री केलेल्या एका मुलीची पोलिसांनी सुटका केली असून तिला सुरक्षेसाठी वालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. तिचा बाळकृष्ण कांबळे हा पिता आहे. तिनेच बाळकृष्ण आणि शफीककडून ती मुलगी विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news