महामंडळांवरील नियुक्त्या होणार तरी कधी?.. अजित पवारांची भाजप श्रेष्ठींकडे नाराजी | पुढारी

महामंडळांवरील नियुक्त्या होणार तरी कधी?.. अजित पवारांची भाजप श्रेष्ठींकडे नाराजी

नरेश कदम

मुंबई : सत्तेत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला चार महिने आणि महायुती सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटले तरी राज्यात विविध महामंडळांच्या नियुक्त्या होत नसल्याबद्दल अजित पवार नाराज असून, त्यांनी ही नाराजी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वासमोर व्यक्त केल्याचे वृत्त आहे. महामंडळांवरील सर्वपक्षीय अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या करणार तरी कधी, असा प्रश्नच त्यांनी भाजपश्रेष्ठींना विचारल्याचे वृत्त आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे आणि नंतर विधानसभा निवडणूकही होणार असताना पक्षाचे कार्यकर्ते, नेते यांना सत्तेतील पदे मिळाली नाही तर त्याचा फटका या निवडणुकांमध्ये बसू शकतो, असा सतर्कतेचा इशाराही त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींना दिल्याचे कळते.

दिल्लीवारीवर गेलेल्या पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली, तेव्हा ही नाराजी त्यांनी शहा यांच्यापुढे व्यक्त केल्याचे कळते. लोकसभा, विधानसभा निवडणूकपूर्वी महामंडळांवरच्या नियुक्त्या केल्या नाही तर पदाधिकारी मन लावून निवडणुकीत काम करणार नाहीत, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केल्याचे कळते.

भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांनी नेत्यांच्या महामंडळावरच्या नियुक्तीसाठी याद्या तयार ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयात या याद्या आल्या असून अंतिम झाल्या आहेत. महामंडळाच्या नियुक्त्यांना दिल्लीश्वरांचा हिरवा कंदील मिळत नसल्याने तीनही पक्ष, त्यांचे कनिष्ठ पातळीवरील नेते व कार्यकर्ते यांच्यात तीव्र नाराजी आहे. ही नाराजी पवारांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे कळविली आहे.

सरवणकरांच्या नियुक्तीने पुन्हा मागणीला उचल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरात न्यासाच्या अध्यक्षपदावर आपल्या गटाचे दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना सिद्धिविनायक मंदिरात न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची अध्यक्षपदाची मुदत संपली, असे कारण मुख्यमंत्री शिंदे गटाकडून सांगण्यात आले. त्यामुळे महामंडळांवरील लांबलेल्या नियुक्त्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Back to top button