मुंबई : न्या. शिंदे समितीला सापडल्या पस्तीस लाख कुणबी नोंदी | पुढारी

मुंबई : न्या. शिंदे समितीला सापडल्या पस्तीस लाख कुणबी नोंदी

दिलीप सपाटे

मुंबई :  मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी व त्याआधारे मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला राज्यभर मराठा समाजाच्या सुमारे 35 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र, एकाच कुटुंबाच्या दुबार नोंदी आणि नोंदी असलेल्या त्यातील बर्‍याच कुटुंबांना आधीच कुणबी दाखले मिळाले असल्याने सापडलेल्या नोंदींतून नवे दाखले मिळणार्‍यांची संख्या मात्र घटणार आहे.

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले द्या, या मागणीसाठी सुरुवातीला मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू झाले होते. मात्र, राज्याच्या अन्य विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात सर्वात कमी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्हे मिळून सुमारे 25 हजार नोंदी सापडल्या आहेत. त्यात सर्वाधिक 12 हजार नोंदी या बीड जिल्ह्यात सापडल्या आहेत.

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी 13 प्रकारचे महसुली दस्तऐवज तपासले जात आहेत. त्यामध्ये राज्यात आतापर्यंत काही कोटी दस्तऐवज तपासण्यात आले असून, त्यातून मराठा समाज हा कुणबी असल्याच्या सुमारे 35 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण असताना या नोंदी फसव्या आहेत. या नोंदींच्या आधारे काही लाख मराठ्यांना कुणबी दाखले मिळणार असल्याचे बोलले जात असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही. ज्या मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचे प्रमाण नगण्य आहे, तेथे कुणबी नोंदी या 25 हजार इतक्याच सापडल्या आहेत. याआधारे दोन ते अडीच लाख मराठ्यांनाच कुणबी दाखले मिळू शकतात. उर्वरित मराठा समाज हा या दाखल्यापासून वंचित राहणार आहे.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. विदर्भात सुमारे 14 ते 15 लाख, तर पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश मिळून 15 लाखांपेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत. पुणे जिल्ह्यात 1 लाख 35 हजार, तर नाशिक जिल्ह्यात सुमारे 1 लाख 75 हजार नोंदी सापडल्या आहेत. मात्र, नोंदींची संख्या जास्त असली, तरी त्यातील अनेकांना आधीच दाखले मिळाले आहेत. नोंदीतील कुटुंब आणि त्यांना दाखले मिळाले की नाहीत, याची तपासणी समितीने केलेली नाही.

Back to top button