प्रदूषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री रस्त्यावर !

'Eknath Shinde
'Eknath Shinde
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहराला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील असताना मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदूषण मुक्त मुंबईसाठी थेट रस्त्यावर उतरले. प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची भल्या पहाटे पाहणी करून, हवा प्रदूषणमुक्तीसाठी पालिका राबवत असलेल्या विविध उपायोजनांबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले.

मुंबई शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून यातून शहराची सुटका करण्यासाठी मुंबई पालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी धूळ हटवून पाण्याने धुण्याचे काम अखंडपणे सुरू आहे. पालिकेकडून विविध उपायोजना हाती घेतल्या असून याची अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. ग्रँटरोड डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी दौर्‍याची सुरुवात केली. एच-पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भुयारी मार्ग परिसर, के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली.

वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी करून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व पालिकेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेने सुरू केलेल्या या स्वच्छता मोहीमेला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्व नागरिकांनी त्यात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.

धुलिकण कमी होतेय

रस्ते, पदपथ व सार्वजनिक ठिकाणी साचलेली धूळ ब्रशने हटवून त्यानंतर पाण्याने धुऊन स्वच्छता केली जात आहे. फॉगर, अँटी स्मॉग व अन्य संयंत्राचा उपयोग केला जात आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील धुलिकण कमी होत आहेत. आता एक हजार टँकर भाडेतत्त्वावर घेऊन संपूर्ण मुंबईतील रस्ते, पदपथ, चौक आदी आलटून पालटून एक दिवसाआड धुवावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. फक्त पहाटे नाही तर दिवसभरामध्ये मुख्य व मोठ्या नाक्यांवर, मुख्य चौकांमध्ये फॉगर मशीन्स लावण्यास सांगितले आहे. जेणेकरून दोन-दोन तासांनी तुषार फवारणी करून धूळ रोखता येईल. धुलिकण कमी करण्यासाठी मुंबईत 40 ठिकाणी वॉटर फॉगर आणि ऍन्टी-स्मॉग गन लावण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

स्वच्छता कामगारांसोबत चहापान

मुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान केले. राज्य शासनामार्फत पालिकेच्या माध्यमातून मुंबईतील स्वच्छता कर्मचार्‍यांच्या सर्व
46 वस्त्यांमध्ये सर्व नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याची सुरुवात कासारवाडी वसाहतीपासून झाली आहे.

प्रसाधनगृहाची स्वच्छता सुरू

मुंबई शहर व उपनगरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छ करण्याबरोबरच निर्जंतुकीकरण करण्याची कामे सुरू आहे. यासाठी खासगी सफाई कामगारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news