

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई विमानतळावरून दिवाळी सणामध्ये प्रवासी संख्येसोबतच तब्बल दोन हजार 500 मेट्रिक टन कार्गोची (माल) वाहतूक झाली आहे. देशांतर्गत दिल्ली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडनला सर्वाधिक माल वाहतूक झाली आहे.
दिवाळीचा आनंद साजरा करताना नातेवाईक-मित्रमैत्रिणींना जलद भेटवस्तू पाठविण्यासाठी विमानाच्या कार्गोचा वापर केला जातो. मुंबई विमानतळावरुन यंदाच्या दिवाळीत झालेल्या मालवाहतुकीत ई-कॉमर्स क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आऊटबाऊंड देशांतर्गत मालामध्ये लक्षणीय 64 टक्के तर इनबाउंड देशांतर्गत कार्गोमध्ये 36 टक्के वाहतूक झाली आहे. ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या क्रेझमुळे विमान कार्गोची मागणी वाढली आहे.
विमान कार्गोचा विचार करता देशांतर्गत वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे.जवळजवळ 56 टक्के वाहतूक देशांत तर 44 टक्के वाहतूक आंतरराष्ट्रीय मार्गावर झाली आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावर लंडन तर देशांतर्गत दिल्लीला सर्वाधिक मालवाहतूक झाली आहे. त्यानंतर हैदराबाद आणि बंगळुरू शहरांमध्ये वाहतूक झाली आहे. देशांतर्गत क्षेत्रातील अग्रगण्य, इंडिगो आणि क्विकजेट एअरलाइन्स या दोन्ही कंपन्यांनी मोठया प्रमाणात मालवाहतूक केली. दरम्यान, दिवाळीच्या काळात मालवाहतूक प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर व्हावी यासाठी मुंबई विमानतळाने धोरणात्मक उपाययोजना राबवल्या होत्या.