एस.टी. चालवताना मोबाईलवर बोलणे आता पडणार महागात

एस.टी. चालवताना मोबाईलवर बोलणे आता पडणार महागात

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असूनही बस चालवताना अनेक चालक मोबाईलवर बोलताना आढळतात, तर काही चालक हेडफोन लावून गाणी, व्हिडीओ ऐकत असतात. अशा बसचालकांवर कठोर कारवाई करा, असे आदेश महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत, त्यामुळे प्रवासादरम्यान मोबाईलवर बोलणे यापुढे चालकांना महागात पडणार आहे

'सुरक्षित प्रवास' हे महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे एस.टी.ने प्रवास करण्यास राज्यातील नागरिक प्राधान्य देतात. परंतु, अलीकडे मोबाईलवर बोलत बस चालवणार्‍या चालकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. तसेच काही व्हिडीओंमध्ये चालक मोबाईलवर हेडफोन लावून गाणी ऐकणे किंवा चित्रपट पाहणे, असे प्रकार करीत असतात. यामुळे एस.टी. महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच मोबाईलवर बोलता-बोलता निष्काळजीपणे अपघात होऊन प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यताही बळावली आहे. याबद्दल समाज माध्यमांतून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एस.टी. महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळेच चालकांची अशी बेपर्वाई महामंडळाने गांभीर्याने घेतली आहे

एस.टी.तून दररोज सुमारे 55 लाख प्रवासी प्रवास करतात. सवलतीमुळे एस.टी.ची प्रवासी संख्या वाढत असताना दुर्घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याचे निर्देश सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.

बस चालवताना मोबाईलवर बोलू नका, हेडफोनचा वापरही टाळा, असे निर्देश सर्व आगारांमधील चालकांना देण्यात आले आहेत. अशा निष्काळजी चालकांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास, व्हिडीओ व्हायरल झाल्यास, त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित चालकावर निलंबनापर्यंतची कारवाई करण्याचे निर्देश एस.टी. प्रशासनाने दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news