मुंबई : पुढील वर्षी 24 सरकारी सुट्ट्या; कर्मचारी वर्गासाठी पर्वणी | पुढारी

मुंबई : पुढील वर्षी 24 सरकारी सुट्ट्या; कर्मचारी वर्गासाठी पर्वणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये किती आणि कधी सार्वजनिक सुट्ट्या मिळणार याची उत्सुकता सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, बँक कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील कर्मचारी अशा सर्वांनाच लागलेली असते. राज्य सरकारने 2024 या नवीन वर्षासाठी 24 सार्वजनिक सुुट्ट्या जाहीर केल्या आहेत. गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर तर दिवाळी एक व दोन नोव्हेंबरला येणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार 8 वेळा सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ शासकीय कर्मचारी-अधिकारी आणि शनिवार-रविवार सुट्ट्या असणार्‍या खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना होणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार पुढील वर्षीच्या सरकारी कर्मचार्‍यांना 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. यात स्थानिक सुट्ट्यांचा समावेश नाही. पुढील वर्षीच्या दोन सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी रविवार तर तीन सुट्ट्यांच्या दिवशी शनिवार आहे. आणखी दोन दिवसांच्या रजा टाकून बाहेरगावी फिरायला जाण्याचे बेत आखणार्‍यांसाठी पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर संधी आहे.

सलग तीन दिवस सुट्ट्यांचा 8 वेळा लाभ

26 जानेवारी शुक्रवारी येत असल्याने आणि शनिवार व रविवार शासकीय सुट्टी वा काही कंपन्यांमध्ये कार्पोरेट सुट्टी असल्याने सरकारी कर्मचारी, अधिकारी वा खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना सलग तीन दिवस सुट्ट्या मिळू शकतात. 19 फेब्रुवारी सोमवारी शिवजयंतीची सुट्टी आहे. 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी शनिवार-रविवार येत असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्यांची संधी शासकीय कर्मचार्‍यांना लाभणार आहे. 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्रीची सुट्टी असून 9 व 10 रोजी शनिवार व रविवारच्या सुट्ट्या असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ शासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गाला घेता येणार आहे. याशिवाय 25 मार्च रोजी सोमवारी होळीच्या दुसर्‍या दिवसाची सुट्टी असल्याने 23 मार्च शनिवार व 24 मार्च रविवार अशा जोडून तीन दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेता येणार आहे.

29 मार्च शुक्रवार रोजी गुड फ्रायडेनिमित्त सुट्टी असून 30 व 31 मार्च अनुक्रमे शनिवार-रविवार अशा सुट्ट्या येत असल्याने सलग तीन दिवस मिळणार आहेत. बकरी ईदनिमित्त 17 जून रोजी सोमवारी सुट्टी येत असल्याने 15 ते 17 अशा सलग तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. ईद-ए-मिलाद निमित्त सोमवार, दि. 16 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने 14 ते 16 सप्टेंबर असा सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ नोकरदारांना मिळणार आहे. गुरुनानक जयंती 15 नोव्हेंबर शुक्रवारी असल्याने 15 ते 17 नोव्हेंबर अशा सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत.

गणेश चतुर्थी

7 सप्टेंबर तर दिवाळी 1 नोव्हेंबरला पुढील वर्षी शनिवारी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर तर दसरा 12 ऑक्टोबर हे दोन्ही महत्त्वाचे सण असणार आहेत. पुढील वर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची सुट्टी 1 नोव्हेंबर शुक्रवार आणि बलिप्रतिपदानिमित्त 2 नोव्हेंबर शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रजा टाकून लाँग वीकेंडची संधी

26 ते 28 मार्च अशी तीन दिवसांची रजा घेतल्यास 23 ते 31 मार्च असा लाँग वीकेंडचा आनंद घेण्याची संधी नोकरदार वर्गाला लाभणार आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक पाच शासकीय सुट्ट्या आहेत. 9 एप्रिल मंगळवारी गुढीपाडव्याची सुट्टी आहे. 6 व 7 एप्रिलच्या शनिवार-रविवारच्या सुट्टीला जोडून 8 एप्रिल सोमवारची रजा घेऊन सलग चार दिवस सुट्ट्यांचा आनंद घेण्याची संधी आहे.

11 एप्रिल गुरुवारी रमजान ईदची सुट्टी आहे. शुक्रवार 12 एप्रिलची रजा घेऊन 13 व 14 एप्रिल रोजी शनिवार-रविवारच्या सुट्टीला जोडून सलग चार दिवस सुट्ट्यांचाही आनंद नोकरदार वर्ग घेऊ शकेल. 17 एप्रिल रोजी बुधवारी रामनवमीची सुट्टी असून यापूर्वीच्या दोन दिवस आधी रजा घेऊन 13 ते 17 असा सलग पाच दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येईल. तसेच 17 नंतरच्या दोन दिवस रजा घेऊन 17 ते 21 असा सलग पाच दिवसांच्या सुट्ट्यांचा लाभ घेता येईल.

महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे बुधवारी सुट्टी असून 29 व 30 एप्रिल रोजी रजा घेऊन 27 एप्रिल ते 1 मे असा सलग पाच दिवस सुट्ट्यांचा बोनस लाभू शकतो. बुद्ध पौर्णिमेनिमित्त 23 मे गुरुवार सुट्टी असून 24 आणि 25 ची रजा घेऊन 23 ते 26 मे अशा सलग चार दिवसांच्या सुट्ट्या मिळण्याची संधी आहे. दरवर्षी पारशी नववर्ष (शहेनशाही) निमित्त मिळणारी सुट्टी यावेळी हा दिवस 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनीच आल्याने स्वतंत्रपणे मिळणार नाही. 15 ऑगस्ट निमित्त गुरुवारी सुट्टी असल्याने शुक्रवारी 16 तारखेची रजा घेऊन 15 ते 18 अशा सलग चार दिवस सुट्ट्यांचा आनंद घेता येईल. महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असून त्यापूर्वीचे दोन दिवस रजा घेऊन 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा सलग पाच दिवस सुट्ट्यांचा आनंद घेता येईल.

पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्या अशा आहेत

शुक्रवार, 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
सोमवार, 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
शुक्रवार, 8 मार्च – महाशिवरात्री
सोमवार, 25 मार्च – होळी (दुसरा दिवस)
शुक्रवार, 29 मार्च – गुड फ्रायडे
मंगळवार, 9 एप्रिल – गुढीपाडवा
गुरुवार, 11 एप्रिल – रमजान ईद
रविवार, 14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
बुधवार, 17 एप्रिल – रामनवमी
रविवार, 21 एप्रिल – महावीर जयंती
बुधवार, 1 मे – महाराष्ट्र दिन
गुरुवार, 23 मे – बुद्ध पौर्णिमा
सोमवार, 17 जून – बकरी ईद (ईद-उल-झुआ)
बुधवार, 17 जुलै – मोहर्रम
गुरुवार, 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
गुरुवार, 15 ऑगस्ट – पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)
शनिवार, 7 सप्टेंबर – गणेश चतुर्थी
सोमवार, 16 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद
बुधवार, 2 ऑक्टोबर – म. गांधी जयंती
शनिवार, 12 ऑक्टोबर – दसरा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर – दिवाळी अमावास्या (लक्ष्मीपूजन)
शनिवार, 2 नोव्हेंबर – दिवाळी (बलिप्रतिपदा)
शुक्रवार, 15 नोव्हेंबर – गुरुनानक जयंती
बुधवार, 25 डिसेंबर – ख्रिसमस

Back to top button