बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार | पुढारी

बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत ‘मॅच फिक्सिंग’ची शक्यता भाजपला वाटत असल्यामुळे विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्याचा आग्रह भाजपने अजित पवार यांच्याकडे धरला आहे.

पार्थ हे अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळमधून पार्थ यांचा 2 लाख 15 हजार 913 मतांनी पराभव केला होता. आपण पुन्हा याच मतदारसंघातून 2024 मध्ये उमेदवार असू, अशी पराभवानंतर त्यांनी घोषणा केली होती; पण आता बारणे हे शिंदे गटात असल्यामुळे पार्थ यांना येथूनही उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून पार्थ यांना उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरू झाली, तेव्हा भाजपने पार्थ यांच्या बाबतीत नाराजी दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी देण्याबाबत भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे एकमत आहे. त्यामुळे पार्थ यांना मावळमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही.

पार्थच्या पराभवाची भाजपला वाटते शक्यता

खडकवासला, दौंड, इंदापूर, भोर, पुरंदर, बारामती आणि हवेली तालुक्यातील काही भाग यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (भाजप) आणि राज्यमंत्री विजय शिवतारे (शिंदे गट) यांच्यासह 2019 च्या निवडणुकीत सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढलेल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यासुद्धा येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मावळ मतदारसंघ आपल्या गटाला मिळणार नाही, हे ओळखून अजित पवार यांच्या गटाने बारामतीसाठी पार्थ यांचे नाव पुढे केले होते. परंतु, सुळे यांच्याविरोधात पार्थ हे मतदारांवर प्रभाव पाडू शकणार नसल्याचे भाजपला वाटते.

…अन्यथा उमेदवार आयात करण्याची वेळ

सुनेत्रा यांना मैदानात न उतरविल्यास सुप्रिया यांना टक्कर देणारा उमेदवार अजित पवार यांच्या गटाकडे नाही. हर्षवर्धन पाटील, शिवतारे किंवा कुल यांना अशा परिस्थितीत राष्ट्रवादीत आयात करावे लागेल. मात्र, अशी लढत भाजपला नको आहे. थेट लढत झाल्यास सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल, असे भाजपला वाटते. पार्थच्या नावाचा आग्रह अजित पवार गटाला धोक्याचा ठरू शकेल. सुप्रिया यांच्याविरोधात सुनेत्रा यांना मैदानात उतरविले नाही, तर इतर मतदारसंघांत भाजप आपल्याला सहकार्य करणार नाही, अशी भीती वाटत असल्यामुळे बारामतीसाठी सुनेत्रा यांच्या नावावर अजित पवार गटाकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Back to top button