पुढारी ऑनलाईन डेस्क : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज (दि.१८) पत्रकार परिषदेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आराेप केले. जाणून घेवूया काय आहे प्रकरण. (Bhujbal Vs Damaniya)
अंजली दमानिया मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या; पण पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यानंतर त्यांनी आपल्या घरीच पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, "मी आज दाखवणार होते की, मंत्री छगन भुजबळ यांची सांताक्रुझमधील टोलेजंग इमारत ही त्यांची नाही आहे तर लुबाडलेल्या जागेवर उभी आहे, मूळ जागा मालकाला अद्याप एक पैसाही मिळालेला नाही. असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी यावेळी केला. "ज्या माणसाला उठसुठ छातीत कळ यायची, ती कळ कुठे गेली", असा सवालही त्यांनी केला.
"फर्नांडिस कुटूंबाचा एक बंगला होता. तो १९९४ ला रहेजाला पुनर्बांधणी करायला दिला. त्याच्या बदल्यात फर्नांडिस कुटूंबाला पाच फ्लॅट मिळणार होते; पण अद्याप ते फ्लॅट मिळाले नाहीत तर रहेजाने तो बंगला समीर भुजबळ यांच्या कन्स्ट्रक्शनला विकला. त्यानंतर त्यावर बुलडोझर फिरवला गेला; पण फर्नांडिस कुटूंबाला एकही पैसाही मिळालेला नाही. मी काही किरीट सोमया नाही, हातोडा घेवून टाईमपास करायला. भुजबळ यांनी काल कष्टाच्या पैशाचे खाताे, असे जाहीर सभेत म्हटले हाेते. त्यांचे कष्टाचे पैसे हे अशा कुटूंबाचे ओरबडून घेतलेले आहेत, असा आराेपही त्यांनी केला. ज्या कुटूंबाचा मी आदर करत नाही त्या कुटूंबातील सुप्रिया सुळे यांना याबद्दल माहिती दिली. त्यांनी ३० सेकंदात मला कॉल करुन या प्रकरणाची माहिती घेतली आणि माणूस पाठवून या कुटूंबाची दयनीय अवस्था पाहिली, असेही दमानिया यांनी सांगितले.
दमानिया म्हणाल्या की, "फर्नांडिस कुटूंबातील ७८ वर्षांची महिला घऱातील तीन मुलांची केस कापण्यापासून सर्व करतात. त्यांना एकच काळजी आहे की त्यांच्या पश्चात असणार्या स्वयंमग्न मुलाची देखभाल काेण करणार? यासाठी मी ज्या वाय बी चव्हाण सभागृहात ज्यामध्ये मी कधी पाऊल टाकलं नसतं त्या सभागृहात जावून या विषयावर चर्चा केली. या चर्चेला समीर भुजबळ यायचे. हे खुप निर्दयी लोक आहेत. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आवाहन केले की, "फर्नांडिस कुटूंबाचे पैसे येत्या ४८ तासात द्यावे. तस जर केलं तर मी स्वत: भुजबळांची आभार मानेन. जर का अस झाल नाही तर मी व हे कुटूंब भुजबळांच्या घराबाहेर जावून बसेन. जर तुमच्यात ह्रदयात जर असेल तर तुम्ही यांचे पैसे द्या, आवाहनही त्यांनी केले.